अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षांचा कठोर कारावास
बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मलिक मेहबूबसाब यलिगार (रा. चिनीवार गल्ली, गोकाक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून गुरुवार दि. 15 रोजी पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला आहे. गोकाक शहरातील आनंद टॉकीजनजीक 18 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 च्या दरम्यान पीडित मुलगी सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी मलिक याने तिला त्याठिकाणी गाठले. तुझ्यावर प्रेम करतो, तसेच तुझ्याशी लग्न करतो, कुठे तरी जाऊया चल असे म्हणत तिला फूस लावून गोकाक येथून जमखंडीला नेले.
जमखंडी येथे महालिंगेश्वर शहरातील यासीन नजीर जमादार हे रहात असलेल्या शेडमध्ये पीडित मुलीला आरोपी घेऊन गेला. त्याचदिवशी दुपारी 3 च्या दरम्यान तुझ्यासोबत मी लग्न करणार आहे, असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे याप्रकरणी गोकाक शहर पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयात आरोपीवर गुन्हा साबीत झाल्याने न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा कठोर कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड, तसेच पीडितेला जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही बजावला. सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.