For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बलात्कार-हत्या प्रकरण सीबीआयकडे?

06:30 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बलात्कार हत्या प्रकरण सीबीआयकडे
Advertisement

आठवड्यात रहस्य न उकलल्यास ममता बॅनर्जी यांची तयारी, वैद्यकीय विद्यार्थ्यांचा देशव्यापी संप

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर निर्घृण बलात्कार करुन तिची नंतर हत्या केल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची तयारी या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. येत्या रविवारपर्यंत या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले नाही, तर तपास सीबीआयकडे दिला जाईल, असे त्यानी स्पष्ट केले. या घटनेच्या विरोधात सोमवारी वैद्यकीय विद्यार्थी संघटनेने देशव्यापी संपाची हाक दिली असून त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील व्यवस्थेवर परिणाम दिसून आला. बहुतेक सर्व वैद्यकीय महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.

Advertisement

बॅनर्जी यांनी सोमवारी पिडित महिला डॉक्टरच्या मातापित्यांची भेट घेतली. लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन आरोपीविरोधात अभियोग उभा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही घटना अत्यंत क्लेषदायक असल्याची भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

सुरक्षा असूनही...

ही घटना ज्या स्थानी घडली तेथे इतर नर्सेसचा वावर होता. महाविद्यालयाची सुरक्षा व्यवस्था होती. तरीही ही घटना घडली हे धक्कादायक आहे. राज्य सरकारने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना हटविले आहे. इतर अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे. श्वान पथक आणि इतर तपास यंत्रणांची नियुक्ती केली आहे. तरीही गुन्हा उलगडला नाही, तर कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय विद्यार्थ्यांचा संप

या घटनेच्या निषेधार्थ देशभरात संप करण्याची घोषणा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संघटनेने केली आहे. संपाच्या काळात महाविद्यालयांच्या आणि शासकीय रुग्णालयांच्या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तरीही सार्वजनिक वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला अंतिम इशारा दिला असून राज्यात सर्वसामान्य जनतेतही प्रचंड प्रक्षोभ या घटनेमुळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाचा आरोप

हे प्रकरण दडपण्याच्या तयारीत ममता बॅनर्जी सरकार आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी या पक्षाकडून करण्यात आली. या पक्षाचे राज्यातील नेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाच्या तपासावर भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून असल्याचे विधान केले. तपास नि:पक्षपातीपणाने करुन खऱ्या आरोपींचा पर्दाफाश झाला पाहिजे, अशी मागणीही भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारकडे केली आहे.

प्रकरण काय आहे?

गेल्या शुक्रवारी कोलकात्यातील शासकीय आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील विश्रामगृहात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एका 31 वर्षीय महिला डॉक्टरवर निर्घृण बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे तिचा लैंगिक छळ करण्यात आल्याचे प्राथमिक तपास आणि शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. प्रारंभी कोलकाता पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त केली. तथापि, नंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोलकत्यात प्रचंड जनक्षोभ उसळला. त्याचे पडसाद राज्यभर आणि दुसऱ्या दिवशी देशभर उमटले. यामुळे तृणमूल काँग्रेसचे राज्य सरकार प्रचंड दबावाखाली आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीबीआय चौकशीची तयारी दर्शविली आहे.

Advertisement
Tags :

.