रणवीर सिंहला मिळाला मोठा प्रोजेक्ट
आदित्य धरच्या चित्रपटात मुख्य भूमिका
प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर यांना ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. आदित्यने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगतात पाऊल ठेवले होते. याचबरोबर त्याने स्वत:च्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकाविला होता. आता आदित्य धर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये मोठा प्रोजेक्ट घेऊन येत आहे.
उरी नंतर आदित्य धरने स्वत:चा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ची घोषणा केली होती. परंतु कोरोना महामारी आणि मग आर्थिक समस्यांमुळे या चित्रपटाची निर्मिती मागे पडली होती. आदित्य आता एका बिगबजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट निर्मितीसाठी सज्ज आहे. आदित्यने अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘धुरंधर’ चित्रपट निर्माण करण्याची तयारी चालविली आहे.
या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेता संजय दत्त तसेच आर. माधवन हे कलाकारही दिसून येतील. चित्रपटात रणवीर महत्त्वाच्या भूमिकेत असेल. हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर धाटणीचा असेल ज्यात नायक एका धोकादायक मिशनवर जात असल्याचे दाखविले जाणार आहे.
आदित्यने स्वत:चा बंधू लोकेश धर आणि एका मोठ्या स्टुडिओसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्यने या चित्रपटाचे चित्रिकरण भव्य स्तरावर करण्याच्या तयारीसोबत निर्मितीपूर्व कामाला प्रारंभ केला आहे.