काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख
वडूज :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य व खटाव तालुक्यातील हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांची काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवड मुंबईतून जाहीर केली आहे. सातारा जिह्यात काँग्रेसला उभारी देणे आणि पक्ष संघटन मजबूत करणे हे प्रमुख आव्हान देशमुख यांच्यापुढे असणार आहे.
रणजीत सिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर अनेक विकासकामे करत त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळीमुळे घट्ट केली. देशमुखांनी पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा, जनजागृती अभियान, दुष्काळी भागासाठी सिंचन योजना या विविध कामांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दुष्काळी माण देशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामाची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून रणजित देशमुख यांची प्रमुख ओळख आहे. फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माण व खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करत जलसंधारण व वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवले. 2020 मध्ये पक्षांतर्गत कारवायांना कंटाळून त्यांनी काही काळ काँग्रेस पासून दूर राहणे पसंत केले होते मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा त्यांना काँग्रेसला राजकारणात सक्रिय केले.
सातारा जिह्यात काँग्रेसला उभारी देण्याकरता रणजित देशमुख यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून देशमुख यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. जिल्हाध्यक्षपदाच्या या स्पर्धेमध्ये नरेंद्र देसाई, अजितराव पाटील- चिखलीकर राजेंद्र शेलार इत्यादी नावे स्पर्धेमध्ये होती. यात काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने रणजित देशमुख यांच्या नावाला पसंती दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची मजबूत संघटन उभे करून निवडणुकीत चमकदार कामगिरी नोंदवणे, हे प्रमुख आव्हान रणजित देशमुख यांच्यापुढे असणार आहे.