‘मर्दानी 3’मध्ये राणी मुखर्जी
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ प्रेंचाइजीचे पहिले दोन चित्रपट यशस्वी ठरले होते. आता तिचा आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’ लवकरच पाहता येणार आहे. यश राज फिल्म्सने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अभिनेत्री या पोस्टरमध्ये पोलिसांच्या गणवेशात नसली तरीही काळ्या रंगाचा शर्ट आणि निळी डेनिम, काळ्या बुट्ससह बंदूक रोखून असल्याचे दिसून येते. वायआरएफने राणीच्या या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनदाखल ‘मर्दानी 3’साठी काउंटडाउन सुरू झाले असून शिवानी रॉय 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर परतणार असल्याचे नमूद केले आहे. राणी या चित्रपटात न्यायासाठी लढणारी साहसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे. तर कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे. आदित्य चोप्राकडून निर्मित या चित्रपटाची कहाणी सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. या सीरिजच्या मागील दोन चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.