For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रंगपंचमी

11:09 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रंगपंचमी
Advertisement

 महिलांसह युवतींचाही सहभाग : मंगळवारी धुळवडीला प्रारंभ, सर्व व्यवहार बंद

Advertisement

खानापूर : शहरासह तालुक्यात होळी उत्सवाला सुरुवात झाली. खानापूर शहरात मंगळवारी सकाळी होलिका दहन करून होळीपोर्णिमा साजरी करण्यात आली. हलगीच्या कडकटासह चिमुकल्यांचा होळी समोर धरलेला फेर तसेच गावागावात परंपरेप्रमाणे घोडेमोडणी, चव्हाटाचे पूजन करून होळी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. तर मंगळवारी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सकाळपासूनच धूळवडीला सुरुवात झाली. ग्रामीण भागात बऱ्याच गावांमध्ये धूलिवंदन दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. अधिकाअधिक गावात प्रथेनुसार रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. गावात धार्मिक विधीदेखील केल्या जातात. तर तालुक्याच्या काही भागात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे.

ग्रामीण भागात सकाळी सातपासूनच धूळवड-रंगपंचमीला सुऊवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. गल्लोगल्लीतील युवक एकत्र येऊन गल्लीच्या कोपऱ्यावर रंगाची उधळण करण्यात दंग झाली होती. यासह अनेक युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगाची उधळण करीत. यामध्ये महिला व युवतींचाही सहभाग होता. हलगीच्या तालावर रंग उधळताना नाचण्याचाही आनंद लुटण्यात आला. ग्रामीण भागात रंगपंचमी असल्याने खानापूरच्या बाजारपेठेत गर्दी दिसून आली नाही. शासकीय कार्यालयात व बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.

Advertisement

तसेच पश्चिम भागात पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह रंगमालाचे विशेष आकर्षक आहे. या रंगमाल कार्यक्रमात पौराणिक कथन सादर करण्यात येते. तसेच गावोगावी नाट्याप्रयोगाचेही आयोजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे नंदगड, लोंढा, बिडी, पारिश्वाड, चापगाव, कारलगा, चन्नेवाडी,  बेकवाड, झुंजवाड, कसबा नंदगड, खैरवाड, भुत्तेवाडी, गर्बेनहट्टी तसेच तालुक्याच्या अनेक गावात सकाळपासूनच रंग उधळणीला प्रारंभ झाला. त्यामध्ये युवा पिढीबरोबरच गावातील अबाल-वृद्धांनीही सहभाग घेतला होता. यावेळी सर्व ठिकाणी रंगपंचमी अत्यंत शांततेने पार पडली. ग्रामीण भागात युवकांनी पार्ट्यांचाही बेत आखला होता.

चव्हाटा देवाची यात्रा 10 रोजी

खानापूर शहरातही होळी दहन मंगळवारी करण्यात आले असून निंगापूर गल्ली येथील चव्हाटा देवस्थानसमोर मंगळवारी प्रथेप्रमाणे होळी उभारण्यात आली. होळी उभारण्यासाठी चव्हाटा गल्लीतील पंच मंडळी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रथेप्रमाणे मार्च 10 रोजी चव्हाटा देवाची यात्रा भरविण्यात येणार आहे. यानिमित्त चव्हाटा देवस्थानची आरास आणि पूजा पुढील पाच दिवस करण्यात येते.

Advertisement
Tags :

.