तालुक्यात होळीला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ
मंगळवारी सायंकाळी धूलिवंदन उत्साहात : चंद्रग्रहणाचे पालन करत ग्रामीण भागात होळीची जपली परंपरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर/किणये
वाईट प्रवृत्ती, दुर्गुनांचे दहन करून नवीन उत्साह आणि सप्तरंगाप्रमाणे आनंदी जीवन जगण्याचा संकल्प ग्रामीण भागात होळी सणाच्या माध्यमातून करण्यात येतो. सोमवारी सायंकाळपासून तालुक्यात होळी सणाला मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी धूलिवंदन झाले. होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणत गावागावांमध्ये होळीला सुरुवात झाली. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदाही ग्रामस्थांनी होळी पूजन करून व होळीचे दहन करून या सणाला सुरुवात केली. मंगळवारी चंद्रग्रहण होते या चंद्रग्रहणाचे पालन करत ग्रामीण भागात होळीची परंपरा जपली आहे.
तालुक्याच्या काही गावांमध्ये सोमवारी सायंकाळी होळी पेटविण्यात आली तर काही गावांमध्ये मंगळवारी सकाळी होळीचे दहन करण्यात आले. मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे बहुतांशी गावात सोमवारी सायंकाळीच होळीचे दहन करण्यात आले. होळी सनानिमित्त अनेक गावांमध्ये पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही गावांमध्ये डोंगरातील व शेत शिवारातील झाड आणून ते होळी म्हणून होळी कामणाजवळ रोवण्याची प्रथा आहे. बहुतांशी ग्रामस्थांनी दोन दिवस आगोदर होळीसाठी लागणारे लाकूड आणले होते. सोमवारी सायंकाळी होळीच्या लाकडाची गावागावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली. होळीची पूजा करताना पाच प्रकारची कडधान्ये भिजवून त्याचे वाटप करण्यात आले. तसेच नाचणीची आंबिल यावेळी प्रसाद म्हणून देण्यात आली.
होळीसाठी लागणाऱ्या लाकडाला केवळ आंबोती बांधण्यात आली होती. हे बांधण्यासाठी जंगलातील वेलींचा वापर करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत होळीची तयारी दिसून आली. काही गावांमध्ये हलगी व बोब मारून सोमवारी सायंकाळीच होळी रोवण्यात आली. तर काही गावांमध्ये मंगळवारी पहाटे होळी रोवण्यात आली. यानंतर पुजारी व हक्कदार यांनी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. पाच दिवस विविध मनोरंजनाचे व इतर कार्यक्रम गावागावांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. या होळीच्या सणापासून ते रंगपंचमी पर्यंत शेतकरी आपल्या शेतशिवारातील कामे बंद ठेवतात आणि पाच दिवस कडक वार पाळणूक करतात.
मच्छे गावात एक गाव एक होळी
मच्छे गावामध्ये आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी बैठक घेऊन एक गाव एक होळी करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ग्रामस्थांना याबद्दल सूचना करण्यात आली होती. या संकल्पनेला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे इतक्या मोठ्या गावात केवळ एकच होळी करण्यात आली. अलीकडे गावचा विस्तार वाढलेला आहे. गावात यापूर्वी गल्लोगल्ल्यांमध्ये होळी रोवण्यात येत होती. यामुळे झाडांची कत्तल अधिक होत होती. झाडांची कत्तल थांबली पाहिजे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या हेतूने गावकऱ्यांनी एक गाव एक होळी अशी संकल्पना राबवून ऐतिहासिक निर्णय घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी सायंकाळी गावात देवस्थान पंच कमिटीच्यावतीने होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर होळी दहन करण्यात आली. त्याच्याच बाजूला होळी कामाणा जवळ गावच्यावतीने एक होळी रोवण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.
नावगे गावात सोमवारी रामलिंग मंदिराजवळ पूजा करून लक्ष्मी मंदिर येथील होळी कामाणाजवळ होळी रोवण्यात आली. त्यानंतर होळीचे पूजन करण्यात आले. बहाद्दरवाडी गावात सोमवारी सायंकाळी होळीची बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर होळीला आंब्याची पाने बांधून सोमवारी रात्री होळी रोवण्यात आली. यावेळी हलगी व बोब असा गजर झाला. मंगळवारी सकाळी पुन्हा हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीची पूजा करण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. किणये गावामध्ये सोमवारी रात्री होळी रोवण्यात आली. होळी सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बामणवाडी, वाघवडे, संतिबस्तवाड, बाळगमट्टी, जानेवाडी, बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळगुंदी, सोनोली, देसूर, झाडशहापूर आदी गावांमध्ये होळीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
ग्रामीण भागात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम
होळी सणामध्ये ग्रामीण भागात विविध प्रकारची वेशभूषा करून मनोरंजन करण्यात येते. आजही काही गावांमध्ये ही परंपरा आहे. मंगळवारी सायंकाळी तालुक्यात धूळवड करण्यात आली. बालचमूंनी गावात फिरून माती उडविली. शिमगोत्सवानिमित्त गावागावातील पंचमंडळी तसेच विविध युवक मंडळाच्यावतीने विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा, भजनी भारुडचे कार्यक्रम व नाट्याप्रयोग आदींचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
कर्ले गावात सर्वात उंच होळी रोवण्याची परंपरा
तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले गावात सर्वात उंच होळी रोवण्याची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे ही परंपरा यंदाही ग्रामस्थांनी जपली आहे. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ होळी रोवण्यात आली. सर्वाधिक उंच होळी सोमवारी सायंकाळी रोवण्यात आली. हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळी रोवताना ग्रामस्थांचा उत्साह अधिक दिसून आला.