तालुक्याच्या पूर्व भागात रंगपंचमी उत्साहात
सांबरा : तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मंगळवारी विविध रंगांची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ, पंतबाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी गावांमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच रंगोत्सवाला प्रारंभ झाला होता. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटण्यात येत होता. काही ठिकाणी पाण्याच्या फवाऱ्यांचीही व्यवस्था केली होती. तर काही शाळांची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. ऐन रंगपंचमीच्या दिवशी शाळा असल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रंगपंचमीनिमित्त सर्वजण एकत्र येत असल्याने या सणाला प्रेम व एकतेचे प्रतिक मानले जाते. सकाळी अकरानंतर चंद्रग्रहणाचे वेध लागल्याने अनेक ठिकाणी अकरा वाजण्याच्या पूर्वीच होळीचे दहन करण्यात आले. एकंदरीत पूर्व भागामध्ये शांततेत रंगपंचमी साजरी करण्यात आली.