रांगोळीसम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन
वेंगुर्ले प्रतिनिधी
जागतिक किर्तीचे रांगोळीकार तथा वेंगुर्ले-कलानगरचे मूळ रहिवासी गुणवंत गंगाराम मांजरेकर (९२) यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. मुंबई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्राचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी रांगोळीसम्राट अशी बिरूदावली बहाल करून त्यांना सन्मानित केले होते.
लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेंगुर्लेत घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांचे काका कृष्णराव मांजरेकर यांनी त्यांना मुंबई येथे नेले होते. तेथेच त्यांनी अकरावी व जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांनी नोकरी पत्करली. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या गुणवंत मांजरेकर यांनी वेंगुर्ले कलानगर येथील आपल्या मूळ घरी आईने शेणसडा झाल्यावर शेडच्या सहाय्याने काढलेली कलाकुसर पाहिली होती. ठिपक्यांच्या सहाय्याने घातल्या जाणाऱ्या रांगोळीचे त्यांना विशेष आकर्षण होते. निसर्गात उपलब्ध होणाऱ्या वस्तू गोळा करून रांगोळीत रंग भरण्याचे कौशल्य त्यांनी बालपणीच अवगत केले होते.
मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी या रांगोळीला नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याकाळी गणेशमूर्ती रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खड्यांच्या रंगाचा कौशल्यपूर्ण वापर करून त्यांनी पांढऱ्या शुभ्र रांगोळीला विविध रंगात परिवर्तीत केले. रांगोळीत विविध प्रयोग करताना विविध नेत्यांची, राष्ट्रपुरुषांची, देवी-देवतांची चित्रे जी पूर्वी जलरंग व तत्सम माध्यमांद्वारे रंगविली जायची ती रांगोळीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. त्यानंतर त्यांनी विविध चित्रे रांगोळीच्या माध्यमातून साकारून मुंबईत भव्य प्रदर्शने भरविण्याचे असंख्य प्रयोग केले. त्याकाळी गुणवंत मांजरेकर यांची रांगोळी प्रदर्शने लोक तिकीटे काढून पाहत असत. मालवणी जत्रोत्सवाची संकल्पना मुंबईत रुजविण्यामागेही त्यांचे मोठे योगदान होते. मुंबईत विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मांजरेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेला वाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.