भोवताली जंगल, किर्र अंधार अन् घोंगावणारा वारा, रांगणा गडावरील सुरक्षित रात्र...
वन, गड, किल्ले, इतिहास प्रेमींनी रचला नवा इतिहास, कारण या गडावर रात्र काढणे फक्त अनुभवींनाच जमते
By : सुधाकर काशिद
कोल्हापूर : संस्कृती इतिहास जपला पाहिजे हे खरे आहे. पण वर्तमानात प्रत्येक जण त्याच्या त्याच्या व्यापात आहे. उर्वरित वेळी गप्पा मारताना संस्कृती, इतिहास हा मुद्दा केवळ तोंडी लावण्यापुरता आता शिल्लक राहिला आहे. इतिहासाचा अभ्यास, इतिहास प्रेमी, गड किल्ले प्रेमी जरूर हे जपण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकीचे आपण ‘आम्हा काय त्याचे’ अशाच त्रयस्थ भूमिकेत आहे. पण याला नक्कीच काही अपवाद आहेत आणि रांगणागडावर (ता. भुदरगड) गड किल्ले, इतिहास प्रेमी तरुणांनी आपल्या परीने जे काही केले आहे ते पाहिले की कुठेतरी आशा जिवंत राहते आहे.
कोल्हापूरपासून 90 किलोमीटरवर भुदरगड तालुक्यात रांगणागड आहे. हजार वर्षापासूनची परंपरा असलेला पुरातन आहे. अकराव्या शतकात शिलाहार राजवटीत तो बांधला गेला. त्यानंतर बहामनी राजवटीच्या ताब्यात गेला, दोन फारशी भाषेतील शिलालेख गडावर आहेत. त्यानंतर आदिलशाहीकडे हा गड गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला. महाराणी ताराबाई यांनी करवीरकरांचे महास्थान म्हणूनच त्याचा आधार घेतला. रांगणागडाच्या डागडूजीसाठी तब्बल सहा हजार सुवर्ण होन इतक्या खर्चाची तरतूद शिवरायांच्या काळात झाली.
औरंगजेबानेही त्याच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले घेतले. भुदरगडचा सामानगड ही घेतला. पारगडही घेतला. पण रांगणागड त्याला घेता आला नाही. याला कारण या रांगणागडाच्या परिसरात असलेले दाट जंगल. होय, अगदी दाट जंगल. या जंगलातून वाट काढत रांगणागड ताब्यात घेणे केवळ अशक्य असेच होते. त्या गडावर शिवरायांच्या काळात तळे खोदले गेले. त्यातील दगडांचा वापर रांगण्याच्या तटबंदीसाठी झाला व तळेही तयार झाले. या रांगण्यावर आजही शिलाहार, बहामनी, आदिलशाही, शिवशाहीच्या काळातील अवशेष पडझड झालेल्या वस्तू दिसतात. त्यात रांगणाई मंदिर, महादेव व अन्य मंदिरे, हवालदाराचा वाडा आहे. त्यापैकी एक महादेवाचे मंदिर निसर्गवेध संस्थेच्या तरुणांनी तेथेच ढासळलेल्या दगड, विटातून पुन्हा उभे केले आहे.
रांगणागडावर इतिहास, पर्यटनाच्या अंगाने येणाऱ्या लोकांची सोय झाली आहे. मंदिरावर त्यांनी पत्रा घातला आहे. रांगणा किल्ल्यावर रात्री राहण्याचा अनुभव घेणाऱ्यांना त्या मंदिराचा सुरक्षित आधार मिळत आहे. कारण नवखे लोक रांगण्यावर दिवस कसाही काढू शकतात. पण या गडावर रात्र काढणे फक्त अनुभवींनाच जमते. कारण सभोवती जंगल, किर्र अंधार, घोंगावणाऱ्या वाऱ्याचा धडकी भरवणारा आवाज, काही झालं तरी आता रात्री गड उतरता येत नाही इतके गच्च आजूबाजूला जंगल. मोबाईलची रेंज नाही. त्यामुळे रांगणा गडावरची रात्र हे एक आव्हान असते.
या परिस्थितीत गडावर सुरक्षित राहता यावे यासाठी या गडावरील महादेव मंदिराचा उपयोग झाला आहे. लोकांनी मुद्दाम आपल्या जिह्यातला हा रांगणागड पहाण्याचे निसर्ग वेध संस्थेचे सर्वांना आवाहन आहे. कारण हा रांगणागड वनदुर्ग आहे. गडावर जाण्यासाठी आठ दहा किलोमीटरची वाट दाट जंगलाची आहे. जंगलात गवे रेडे, बिबट्या, ब्लॅक पॅंथर, पट्टेरी वाघ यांचे अस्तित्व आहे. आणि हे वातावरण एकदा तरी आपण सर्वांनी अनुभववावे अशी त्यांची विनंती आहे. अर्थात एखाद्या जाणकाराला सोबत घेऊनच रांगणागड पहावा अशा त्यांच्या सूचनाही आहेत.
रांगणागडाला दोन बाजू आहेत. एक बाजू कोल्हापूर जिह्यातील व दुसरी सावंतवाडीतली आहे. दुसऱ्या बाजूने गड उतरला की, ती वाट सावंतवाडी तालुक्यात जाऊन पोहोचते. निसर्ग वेध संस्थाचे सदस्य कायम या गडावर येतात. सर्व मंदिरात दिवा, पणती लावतात. रांगोळीने छोटीशी रांगोळी काढतात. पर्यटकांनी गडावर करून ठेवलेला कचरा कपटा उचलतात. गड स्वच्छ ठेवतात या संस्थेने त्यांच्या ताकतीने गड स्वच्छ ठेवला आहे आणि संस्कृती इतिहास जतन करण्याचे काम जेवढी त्यांची ताकद तेवढ्या ताकदीने सुरू आहे.
हे आपले कामच आहे
निसर्ग वेध संस्थेच्या भगवान चिले, अभिजीत दुर्गुळे, अनिल माने, अवधूत पाटील, सतीश जाधव, राहुल पाटील यांची रांगणा गडाचा इतिहास, संस्कृती, जपण्याची धडपड आहे. यातला जो तो आपापल्या व्यापात आहे. पण म्हणून आपले कर्तव्य विसरायचे नाही अशी त्यांची याtourism मागची भावना आहे.