रणदीपसिंग सुरजेवाला कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी
लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वषी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदावर असलेल्या प्रियंका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अविनाश पांडे उत्तर प्रदेश प्रभारी असतील. सचिन पायलट यांच्यावर छत्तीसगडमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी करण्यात आले असून महाराष्ट्राची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रमेश चेन्निथला यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर माणिकराव ठाकरे यांच्याकडे गोवा, दिव आणि दमण, दादरा नगर हवेलीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे सध्या कोणत्याही राज्याची जबाबदारी नसली तरी त्या पक्षाच्या सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून पक्षातील विविध राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वाच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून देवरा यांची नियुक्ती संयुक्त खजिनदारपदी करण्यात आली आहे. मोहन प्रकाश यांच्या खांद्यावर बिहारचे प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशची जबाबदारी डॉ. चेल्लाकुमार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंदीगडची धुरा देण्यात आली आहे.
संघटनेतील फेरबदलादरम्यान प्रियंका गांधी यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आलेले नाही. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकुल वासनिक यांना गुजरातमध्ये तर जितेंद्र सिंह यांच्याकडे आसाम आणि मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांना कर्नाटकात तर दीपक बाबरिया यांच्याकडे दिल्ली-हरियाणाचा कार्यभार आहे. कुमारी सेलजा यांना उत्तराखंडला पाठवण्यात आले आहे. संघटनेतील संपर्क विभागाची जबाबदारी ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यावर येऊन पडली असून के. सी. वेणुगोपाल संस्थेचा कारभार पाहतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दोन दिवसांनी या नियुक्त्या झाल्या आहेत.