तोराळी-हब्बनहट्टी परिसरात टस्कराचा धुमाकूळ
ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/जांबोटी
तोराळी-हब्बनहट्टी-बैलूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एका टस्कराने धुमाकूळ घातला असून त्यांच्याकडून ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गवीरेडे, रानडुकरे, कोल्हे, माकड आदी प्राण्यांचे या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून त्यांच्याकडून ऊस, मिरची आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरापासून या भागात हत्तींचा उपद्रव कमी झाला होता. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच या भागात एका टस्कराचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गाची झोपच उडाली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी कालमणी, देवाचीहट्टी जंगलातून या टस्कराचे तोराळी गावच्या शेतवडीत आगमन झाले आहे. चार दिवसापूर्वी टस्कराने तोराळी गावच्या शेतवडीत धुमाकूळ घालून जयराम बळजी यांच्या सर्व्हे नंबर 374 मधील ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच कृष्णा टोपाण्णा पाटील यांच्या शेतवडीमधील पिकांचे नुकसान केल्यामुळे त्यांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. रविवारपासून टस्कराने आपला मोर्चा हब्बनहट्टी-बैलूर गावच्या शेतवडीत वळविला असून सध्या त्यांचे वास्तव्य मलप्रभा नदी तिरावरील शेतवडीत आहे.
वनाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
या परिसरात सध्या ऊस, केळी, उन्हाळी मिरची आदी पिके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टस्कर या ठिकाणी ठाण मांडण्याची शक्यता आहे. जयराम बळजी यांनी टस्कराच्या आगमनाची माहिती वनखात्याला दिली आहे. जांबोटी विभागाच्या उपवन अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर टस्कराचा त्वरित बंदोबस्त करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.