For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉपर वायर चोरीने रामनगरचा पाणीपुरवठा ठप्प; जॅकवेलमधून 35 हजारांची वायर लंपास; दोन विद्युत मोटारींची सुमारे 60 मीटर वायर चोरी

05:01 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॉपर वायर चोरीने रामनगरचा पाणीपुरवठा ठप्प  जॅकवेलमधून 35 हजारांची वायर लंपास  दोन विद्युत मोटारींची सुमारे 60 मीटर वायर चोरी
Advertisement

रामनगर | प्रतिनिधी : रामनगर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पांढरा नदीलगतच्या जॅकवेलमधील दोन विद्युत मोटारींची सुमारे 60 मीटर कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. चोरीला गेलेल्या वायरची अंदाजे किंमत 35 हजार रुपये असल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली.

Advertisement

जॅकवेलमधील विद्युत मोटारींच्या वायरची चोरी झाल्याने मोटारी बंद पडल्या आहेत. नवीन वायर बसवून पाणीपुरवठा यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत रामनगर ग्रामस्थांना पाणीपुरवठ्याच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, दिवसा ही चोरी झाल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही पोस्ट ऑफिसजवळील विद्युत मोटारीची वायर चोरीला गेल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्युत मोटारींच्या वायरला लक्ष्य करणाऱ्या टोळीचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी ग्रामपंचायतीने केली आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जॅकवेल परिसरात मद्यपींचा वावर वाढला

दरम्यान, पांढरा नदीजवळील जॅकवेल परिसरात मद्यपी तसेच नशा करणाऱ्या युवकांचा वावर वाढल्याचे ग्रामपंचायतीने निदर्शनास आणून दिले आहे. परिसरात दारूच्या बाटल्या आढळून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर जॅकवेल परिसरात पोलिसांनी नियमित गस्त वाढवून मद्यपी व नशा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वायर चोरीप्रकरणी पोलिसांकडून तपास करून चोरट्यांचा शोध घेण्यात येतो का, याकडे रामनगर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

.