प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा मुहूर्त
अयोध्येत अभिजीत मुहूर्तात होणार रामलल्लाची पूजा
अयोध्या/ वृत्तसंस्था
22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा अतिसूक्ष्म मुहूर्त असणार आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील विद्वान आणि ज्योतिषाचार्यांना शुभ मुहूर्त निश्चित करण्यास सांगितले होते.
काशीचे ज्योतिष्याचार्य पंडित गणेश्वर शास्त्राr द्रविड यांनी निवडलेला मुहूर्त सर्वात अचूक मानत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. शुभ मुहूर्ताचा हा क्षण 84 सेकंदाचा असून तो दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंदांपासून 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत असणार असल्याचे मानले जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामलल्लाच्या स्थापनेसाठी अनेक तारखांचे पर्याय दिले होते, ज्यात 17 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंतच्या 5 तारखा होत्या, परंतु काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वर शास्त्राr द्रविड यांनी 22 जानेवारी ही तारीख आणि एक मुहूर्त निवडला आहे. 22 जानेवारीचा दिवस मुहूर्ताच्या दृष्टीकोनातून दोषमुक्त आहे. ही तारीख आणि हा मुहूर्त अग्निबाण मृत्यूबाण, चोरवाण, नृपवाण आणि रोगवाणापासून मुक्त असल्याचे त्यांचे सांगणे आहे.
काशीचे वैदिक विद्वान लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. 17 जानेवारीपासून या पूजनाला प्रारंभ होणार आहे. यात रामलल्ला अयोध्या नगरीच्या भ्रमणावर निघणार आहेत. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा विधी पार पडेल आणि 22 जानेवारी रोजी रामलल्ला स्वत:च्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. प्राणप्रतिष्ठेचा पूर्ण सोहळा वैदिक पद्धतीने होणार असून याकरता देशभरातील आचार्य सहभागी होणार आहेत.
22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या नवनिर्मित मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. याकरता रामनगरीत जोरदार तयारी सुरू आहे. रामनगरीत कानाकोपऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. सीआरपीएफ, यूपीएसएसएफ, पीएसी आणि पोलीस तैनात केले जाणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. अयोध्यात विनाअनुमती ड्रोन उड्डाणावर बंदी असणार आहे.
अभिजीत मुहूर्ताचे महत्त्व
अभिजीत या शब्दाचा अर्थ विजेता किंवा विजयी असा होतो. सनातन धर्मात कुठलेही मंगलकार्य सुरू करण्यापूर्वी मुहूर्ताची विशेष खबरदारी घेतली जाते. शुभ मुहूर्तात कुठलेही मंगलकार्य केल्यास ते यशस्वी ठरते आणि देवीदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. यापैकी एक शुभ मुहूर्त आहे अभिजात मुहूर्त. या मुहूर्ताचे वैशिष्ट्या म्हणजे दिवसावेळच्या अभिजीत मुहूर्तामध्ये भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता. तर रात्रीच्या अभिजीत मुहूर्तात भगवान श्रीकृष्ण अवतरले होते. अभिजीत मुहूर्तात सर्वप्रकारचे दोष दूर करण्याची शक्ती असते, कुठल्याही शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्यास अभिजीत मुहूर्तात कार्य केल्याने निश्चित यश मिळते असे धर्माच्या विद्वानांकडून सांगण्यात येते.