For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिन्यात 62 लाख भाविकांकडून रामलल्ला दर्शन

07:05 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिन्यात 62 लाख भाविकांकडून रामलल्ला दर्शन
Advertisement

अयोध्येने मोडला सर्व मंदिरांचा विक्रम : दानपेटीतही भरभक्कम वाढ

Advertisement

दर्शनाची आस...

  • प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एक महिना पूर्ण
  • दररोज सरासरी दोन लाख भक्तांची भेट

वृत्तसंस्था /अयोध्या

Advertisement

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाला पूर्ण विधीपूर्वक अभिषेक केला. या सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. मंदिरात दररोज रेकॉर्डब्र्रेक भाविक येतात. गेल्या एका महिन्यात रामलल्ला भाविकांच्या आकड्याच्या बाबतीत दररोज नवनवे विक्रम रचत आहेत.

रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. मंदिर प्रशासनाच्या नव्या वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता रामलल्लाच्या मूर्तीची शोभा आरती सुरू होते. त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक अयोध्येला पोहोचत आहेत. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे 62 लाख लोकांनी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच भाविकांनी 50 कोटी ऊपयांची देणगी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, 14 कर्मचाऱ्यांची टीम चार दानपेट्यांमधील दानाची मोजणी करत असून त्यात 11 बँक कर्मचारी आणि तीन मंदिर ट्रस्ट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये भाविक दान टाकत असतात. याशिवाय 10 संगणकीकृत काउंटरवरही लोक देणगी देतात. या देणगी काउंटरवर मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते संध्याकाळी काउंटर बंद झाल्यानंतर देणगीची रक्कम ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. देणग्या गोळा करण्यापासून ते मोजण्यापर्यंतची प्रक्रिया सीसीटीव्ही पॅमेऱ्यांच्या निगराणीखाली केली जाते.

रामभक्तांच्या गर्दीचा ओघ कायम

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला एक महिना पूर्ण झाला आहे. अयोध्येतील भव्य आणि दिव्य राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला महिना उलटल्यानंतरही रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अजूनही रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांचा ओघ कायम आहे. प्राणप्रतिष्ठेला महिना उलटूनही लाखो रामभक्त दररोज आपल्या आराध्य रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. एकंदरीत, अयोध्येतील वातावरण दिवसेंदिवस अधिकच भक्तीमय होताना दिसत आहे.

अनेक महनीय व्यक्ती रामलल्लाचरणी लीन

गेल्या महिनाभरात विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांशिवाय बॉलिवूड स्टार्सनीही मंदिराला भेट दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या कुटुंबासह मंदिराला भेट दिली. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही आपल्या सहकारी मंत्र्यांसह अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेतले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 11 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या सुमारे 300 सदस्यांसह राम मंदिराला भेट दिली होती. मंगळवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही आपल्या मंत्रिमंडळासह मंदिराला भेट दिली.

Advertisement
Tags :

.