पर्येतील रामेश्वर मांद्रेकर गजाआड,पोळेच्या रवीत भंडारीचा शोध जारी
काणकोण पोलिसांकडून आतापर्यंत चौघांना अटक
काणकोण : काणकोणात सरकारी नोकरी देतो असे सांगून 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना अटक होण्याचे प्रकरण ताजे असतानाच पैंगीण येथील कृष्णा कमलाकर नाईक याला पोलिस खात्यामध्ये नोकरी देतो असे सांगून 5 लाख रुपयांचा गंडा घालण्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी काणकोणच्या पोलिसांनी पर्ये येथील रामेश्वर मांद्रेकर या युवकाला अटक केली आहे, तर पोळे येथील रवित भंडारी या संशयिताच्या शोधात सध्या काणकोणचे पोलिस गुंतले आहेत.
वर्षभरापूर्वी पोलिस खात्यामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन सदर दोघांनी आगाऊ रक्कम म्हणून आपल्याकडून पाच लाख रु. घेतले होते. मात्र वर्ष उलटले, तरी नोकरीचा पत्ता नाही, असा दावा करून कमलाकर नाईक यांनी काणकोणच्या पोलिसस्थानकावर तक्रार केल्यानंतर हे नवीन प्रकरण पुढे आले आहे. काणकोणचे निरीक्षक हरिश रा. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल वेळीप पुढील तपास करत आहेत.
यापूर्वी लोलये पंचायतीच्या सरपंच असलेल्या इडडर, लोलये येथील निशा च्यारी यांना 15 लाख रुपयांना फसविल्याच्या तक्रारीवरून इडडर येथील प्रीतेश च्यारी, महालवाडा येथील मिथिल च्यारी आणि मडगाव येथील पराग रायकर यांना काणकोणच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काणकोणच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला असला, तरी दहा दिवस काणकोणच्य्ाा पोलिसस्थानकावर हजेरी लावण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे. सध्या त्यांची चौकशी चालू असतानाच हे नवीन प्रकरण पुढे आले आहे.
सध्या तरी काणकोणात दोन प्रकरणे उघड झाली असून अजून किती प्रकरणे पुढे येतील हे सांगणे कठीण झाले अहे. सरकारी नोकरी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे चित्र निर्माण झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती मिळवायला हवी या हव्यासापायी काही पालक आपल्याजवळ जे काही असेल ते विकून सरकारी नोकरीसाठी लाच द्यायला पुढे सरसावू लागले आहेत. दुसऱ्या बाजूने ही सरकारची नाचक्की असून लाच दिल्यास गोव्यात सरकारी नोकरी मिळते, असा चुकीचा संदेश सध्या देशभर पोहोचला आहे, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगताना ऐकायला मिळत आहे.