रमेश बिधुरी यांचे वादग्रस्त वक्तव्य
प्रियांका गांधी यांच्यावरील टिप्पणीने काँग्रेस संतप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी एका प्रचारसभेत प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. ‘एक्स’वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ‘कालकाजी मतदारसंघातील सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे बनवीन’ असे वक्तव्य बिधुरी यांनी केलेले दिसते. या वक्तव्यावर पवन खेडा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करताना ‘हे गैरवर्तन केवळ बिधुरी यांची मानसिकता दर्शवत नाही, तर ते त्यांच्या पक्षाची नीति आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूल्ये व्यक्त करते’ असे स्पष्ट केले आहे.
बिधुरी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ‘एक्स’वर शेअर करत बिधुरी यांच्यावर जोरदार प्रहार चढवला. ‘एक्स’वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रमेश बिधुरी प्रचारसभेत बोलताना दिसत आहेत. ‘लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवू, पण ते तसे करू शकले नाहीत. आता मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगमविहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे कालकाजीमधील सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे बनवीन’ असे भाषण बिधुरी यांनी केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर बिधुरी यांनी प्रियांकावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करत कोणी दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्ट केले. त्याचवेळी माझ्या विधानावर आक्षेप असेल तर काँग्रेसने आधी लालू यादव यांना हेमा मालिनी यांची माफी मागायला सांगावी, कारण त्यांनीही तसे वक्तव्य केले होते, याची आठवण बिधुरी यांनी करून दिली आहे.