For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामदूत हनुमान.....2

06:48 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामदूत हनुमान     2
Advertisement

घरातल्या लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी एकमेव देवता म्हणजे हनुमंत. प्रत्येकाला त्याच्यातल्या वेगवेगळ्या गुणांमुळे तो आपलासा वाटतो. हनुमंताची ओळख त्याच्या प्रत्येक कृतीवरून आपल्याला होते आणि सुंदरकांड वाचता वाचता आपण थक्क व्हायला लागतो. एखादं काम शिरोधार्य मानलं की ते तहानभूक विसरून करायचं असतं, हे शिकवणारे हनुमान आपण वाचता वाचता उलगडायला लागतो. समुद्र पार करताना वनवासाच्यावेळी त्याच्या वाटेत अनेक संकटे हात जोडून उभी होती. परंतु या संकटांना न घाबरता योग्य प्रकारे तोंड देऊन हनुमंत पुढे सरकत राहिले. कधी संकट अजस्त्र मोठे होते तर कधी मृत्यूचं आव्हान देणारे होते, कधी पुढचा क्षण पाहायला मिळतो की नाही असंही वाटायचं पण प्रत्येक संकटाला सामोरे जातांना वेगळी कृती करायला लागत होती. वेगळा विचार करायला लागत होता. सुरसा, सिहीका नावाच्या राक्षसी त्याला खाण्याकरता आतुर झाल्या. त्यांच म्हणणं एवढंच होतं की मी तुला खाऊन टाकेन. त्याच्यासमोर शक्ती प्रकट न करता हनुमंताने सूक्ष्मरूप धारण केलं. अगदी अंगठ्या एवढ्या आकाराचा झाला आणि त्यांच्या प्रचंड पसरलेल्या जबड्यात आत जाऊन बाहेर येईपर्यंत त्यांना जबडा मिटणेच कठीण झाले. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या म्हणण्यानुसार तोंडातही प्रवेश करून झाला आणि संकट टाळून पुढे निघणारा  ठरला. अनेक कामे हनुमंताने बुद्धीच्या साह्याने केलेली दिसतात. ताकद दाखवताना अजस्त्र रूप धारण करतात तर काही वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते या नियमानुसार हनुमंत वागले. हनुमंताला या कामावर, सीता शोधण्यासाठी पाठवताना श्री रामाने त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अग्निपरीक्षा घेतल्या. त्यातली पहिली परीक्षा होती बौद्धिक क्षमतेची. दुसरी परीक्षा होती प्रलोभन आणि भीती यांना भीक न घालणारी आणि तिसरी होती ती म्हणजे त्याच्यातल्या शौर्याची.

Advertisement

कामाला चाललेला असताना मला विश्रांती किंवा जेवण माहितीच नाही अशा प्रकारची माणसं जर आज आमच्या भारतात निर्माण झाली तर आमचं किती मोठं भाग्य? समजायला हवं. श्रीलंकेची नगरदेवता वेशीवरती युद्धाचे आव्हान देत उभी होती. हनुमंताने ते पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न लावता तिला जागेवरच ठार करून टाकलं. या ठिकाणी त्याचं शौर्य दिसतं पण हाच हनुमंत अशोक वनात गेल्यानंतर दास्य भावाने कर्तव्यदक्ष सैनिकासारखा सीतेसमोर हात जोडून उभा राहतो. सर्व निरोप तिला यथास्थितीत सांगतो. दुसऱ्याचे मन जाणणारा हनुमंत सीतेला धीर देखील देतो. तिला बरोबर येण्याची विनंती करतो पण ही विनंती मात्र सीता मान्य करत नाही. मला स्वत: राम घ्यायला येतील, तेव्हाच मी इथुन बाहेर पडेन, असं निक्षून सीतामाई सांगते. अशावेळी हनुमंत ती आज्ञा समजून बाहेर पडतो पण जाता जाता आपली ओळख रावणाला करून देऊन द्यायला विसरत नाही. अशोक वाटिकेमधल्या अनेक वृक्षांचा संहार करून तिथे अनेक झाडे उद्ध्वस्त करून तो बाहेर पडणार होता परंतु तेथील सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि रावणाच्या समोर आणलं. आपल्या अशोक वनाचा नाश करणाऱ्या वानराला मारून टाकलं पाहिजे असं सांगितल्यानंतर तिथे दरबारात बसलेल्या बिभीषणाने आधी हा कोण आहे, कशासाठी आला आहे ते विचारा असं म्हटलं.

जेव्हा हनुमंताने मी रामदूत हनुमान असं सांगितलं. त्यावेळी ह्या दूताला न मारता त्याच्या शेपटीला आग लावण्यात आली. शत्रूच्या घरात जाऊन घुसून मारण्याचा जो प्रकार असतो तो ह्या ठिकाणी उत्तम रीतीने पार पडला.

Advertisement

शत्रूचे साहित्य घ्यायचं आणि शत्रूच्या नगरीचं नुकसान करायचं. ही गोष्ट हनुमंताने त्या ठिकाणी केली. अर्थातच हनुमंताला अग्नीपासून भय कधीच नव्हतं कारण त्याला वर लाभलेला होता. अशा या हनुमंताने आपली शेपटी जवळच्या समुद्रात भिजवली आणि पुन्हा तो रामाकडे जायला निघाला.

पण जाता जाता त्याने आपण काय आहोत याची चुणूक दाखवली. जर रामाचा एक सैनिक इतका मोठा विध्वंस करू शकतो तर त्याची पूर्ण वानरसेना पुढे श्रीलंकेचे काय करेल या विचारानेच रावण अर्धमेला झाला.

पुढे याच हनुमंताने राम रावणाच्या युद्धाच्या आधी रावणाच्या अनेक मंत्र्यांना बद्ध करून रामाच्या बाजूला वळवलं होतं आणि ही लढाई जिंकली होती. अशा या हनुमंताची अनेक उदाहरणं किंवा कथा पाहिल्या की आपण नतमस्तक होतोच. जय हनुमान.

Advertisement
Tags :

.