रामदार कदम यांची कोकणातील MNS च्या राज्य सरचिटणीसांना खुली ऑफर, म्हणाले..
चिंचघरातील कार्यक्रमात रंगली राजकीय टोलेबाजी
खेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गळाला लावण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे. शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम हेसुद्धा यात मागे नाहीत. आता तर त्यांनी थेट मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिंदे गटात येण्याची खुली ‘ऑफर’ दिली आहे.
आमच्यातील मतभेद भैरीच्या पायाखाली गाडून टाकतोय, असे सूचक विधान त्यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. कदमांच्या या ऑफरनंतर आता वैभव खेडेकर यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. चिंचघर-प्रभूवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळ्याप्रसंगी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना उपनेते संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्यात रंगलेली राजकीय टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली. रामदास कदम म्हणाले, वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे. मीच त्यांना राज ठाकरेंकडे घेऊन गेलो होतो. आपण एकाच कुटुंबातील माणसं आहोत. वैभव खेडेकरांना आता नेमके काय करायचे आहे हे त्यांना माहिती आहे. समझने वाले को इशारा काफी है, अशी शेरोशायरीही करत कदम यांनी खेडेकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्याची खुली ‘ऑफर’ दिली.
याच कार्यक्रमात उदय सामंत यांनीही राजकीय टोलेबाजी करत आज जे व्यासपीठ तयार झालंय ते असंच रहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच संजय कदम यांनी रामदास कदम यांचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे माझी अडचण दूर झाल्याचा टोलाही लगावला.
काही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द
दरम्यान, कदम यांनी खेडेकर यांना दिलेल्या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा असताना शनिवारी जिह्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. याबाबत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच ज्या-ज्या ठिकाणी पदाधिकारी काम करत नव्हते त्या-त्या ठिकाणी पक्ष बळकटीसाठी फेरबदल केले होते. रद्द करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑफर’ या येतच असतात, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.