कवी गुलजार यांच्यासह रामभद्राचार्य यांना ‘ज्ञानपीठ’
58 व्या पुरस्कारासाठी निवड : देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संस्कृतमधील विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य आणि महान उर्दू कवी गुलजार यांची 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 2023 या वर्षासाठी ज्ञानपीठ निवड समितीने शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी या दोन नावांची घोषणा केली आहे. हा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे. भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टतर्फे भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गीतकार गुलजार यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमधील कवी गुलजार सामान्यत: हिंदी-उर्दू शब्द वापरून गाणी आणि गझल लिहितात. उर्दू भाषेतील कार्य आणि योगदानासाठी त्यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तर रामभद्राचार्यांनी संस्कृतमध्ये अनेक पुस्तके लिहिली असून त्यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या लेखनावरही विस्तृत संशोधन केले आहे. संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल जगद्गुरु रामभद्राचार्य यांना हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
रामभद्राचार्य : 22 भाषांचे ‘ज्ञानी’
जगद्गुरु रामभद्राचार्य हे चित्रकुट येथील ‘तुलसीपीठ’चे संस्थापक आहेत. ते दिव्यांगांसाठी एक विद्यापीठ आणि शाळादेखील चालवतात. त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांनी रामभद्राचार्यांची दृष्टी गेली. त्यांना 22 भाषांचे ज्ञान असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी त्यांना पद्मविभूषणनेही गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने 2015 मध्ये त्यांना हा पुरस्कार दिला होता.
कवी गुलजार यांचे कर्तृत्व
गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी निष्णांत असून ते सध्याच्या काळातील उत्कृष्ट उर्दू शायरांपैकी एक मानले जातात. त्यांचे पूर्ण नाव संपूर्ण सिंग कालरा असे आहे. गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी अविभक्त भारतातील झेलम जिल्ह्यातील देना गावात झाला होता. त्यांची आई लहान वयातच मृत झाली. तर वडील माखन सिंग हे छोटे व्यापारी होते. बारावीमध्ये नापास झालेल्या गुलजार यांना साहित्याची प्रचंड आवड होती. रवींद्रनाथ टागोर आणि शरतचंद्र हे त्यांचे आवडते लेखक होते. यापूर्वी त्यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि उर्दूमधील त्यांच्या कामासाठी किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. गुलजार यांच्या प्रमुख रचनांमध्ये ‘चाँद पुखराज का’, ‘रात पश्मीने की’ आणि ‘पंद्रह पांच पंचहत्तर’ यांचा समावेश आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराची ओळख
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. हा पुरस्कार केवळ लेखकांना प्रोत्साहनच देत नाही तर भारतीय साहित्य समृद्ध करतो. ज्ञानपीठ हा पुरस्कार सर्वप्रथम 1965 मध्ये मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना ओडक्कुझल या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला 11 लाख रुपये दिले जातात. याशिवाय मानपत्रासोबत वाग्देवीची कांस्य मूर्तीही देण्यात येते. आठव्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या 22 पैकी कोणत्याही भाषेत लेखन करणारा भारताचा कोणताही नागरिक पुरस्कारासाठी पात्र आहे. देशातील कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पुरस्कारासाठी मानांकन करू शकते. पुरस्कारासाठी निवड तज्ञ समितीद्वारे केली जाते. 2022 मधील ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना देण्यात आला होता.