रामायण हा ग्रंथ नसून परमेश्वराचे घर!
स्वामी अद्वैतानंद : चिन्मय मिशनतर्फे प्रवचनाचे आयोजन : रामायणातील विविध प्रसंगांवर प्रवचनमाला
बेळगाव : सध्या आपले मन केवळ पैसा, नातेसंबंध व खाद्यपदार्थांमध्ये अडकले आहे. परमेश्वराची आठवणसुद्धा आपल्याला होत नाही. परंतु परमेश्वरापासून जेवढे दूर जाल तेवढ्या समस्या, दु:ख, तणाव वाढत जातील. सुखाप्रती जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रामायण. जीवनात शांती, समाधान हवे असेल तर रामायण नक्की ऐकावे. रामायण हा ग्रंथ नसून, ते परमेश्वराचे घर असल्याने तेथून अनेक संस्कार आपल्यावर घडतात, असे उद्गार स्वामी अद्वैतानंद यांनी काढले. चिन्मय मिशन बेळगावच्यावतीने गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहामध्ये स्वामी अद्वैतानंद यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या प्रवचनमालेतील पहिले पुष्प त्यांनी ‘रामायणातील विविध प्रसंग’ या विषयावर गुंफले. अत्यंत रसाळ वाणीने त्यांनी रामायणातील प्रसंग सादर केले. सत्संग हा स्वर्गाप्रमाणे असून, परमेश्वराशी समरुप होण्याचा मार्ग आहे. आपल्या जीवनात अशांती जास्त असून, विश्रांती मात्र खूप कमी आहे. सर्वांना समाधान देण्यासाठी परमेश्वराशिवाय पर्याय नाही. आज प्रत्येकाजवळ पैसा, संपत्ती आहे.
दैनंदिन जीवनात रामायणाचा चुकीचा वापर
उत्तर व मध्य भारतामध्ये रामायण शब्दाचा वापर चुकीच्या अर्थाने घेतला जातो. स्वत:चे दु:ख सांगणाऱ्या व्यक्तीला तू रामायण सांगू नकोस, असे म्हटले जाते. परंतु रामायण हे दु:खाचे कथन करणारे चरित्र नसून दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारा महाग्रंथ असल्याचे स्वामी अद्वैतानंद यांनी सांगितले.