For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अगा जे घडलेची नाहीचे शिकार रामाफोसा

06:07 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
अगा जे घडलेची नाहीचे शिकार रामाफोसा
Advertisement

देशोदेशींच्या प्रमुखांना आपल्या कार्यालयात आणायचे आणि प्रसार माध्यमांसमोर त्यांचा जाहीर पाणउतारा करायचा असा अनिष्ट पायंडा अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाडताना दिसतात. गेल्या फेब्रुवारी महिन्यात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा उपमर्द करण्यात आला तर गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका देशाचे अध्यक्ष सीरील रामाफोसा यांच्यावर अशीच वेळ आली. फरक इतकाच की, रामाफोसा यांनी ट्रम्प यांच्या आरोपांना संयमपणे उत्तरे दिली. त्यांनी पूर्णत: आपला ‘झेलेन्स्की’ होऊ दिला नाही.

Advertisement

रामाफोसा देशाचे अमेरिकेशी बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत आले होते. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेस अत्यंत आवश्यक असलेली मदत रद्द केली, या देशाच्या राजदूतास हद्दपार केले, द. आफ्रिकेतून आलेल्या गोऱ्या लोकांना आश्रय देण्याचे आवाहन केले, गाझामधील नरसंहाराबद्दल द. आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यावर ट्रम्प यांनी इस्त्रायलच्या बाजूने टीका केली. त्याचप्रमाणे जानेवारीत रामाफोसा यांनी केलेल्या नव्या जमीन अधिग्रहण कायद्यावर तेथील गोऱ्या अल्पसंख्याकांवर तो अन्याय करणारा आहे असा आक्षेप ट्रम्पनी नोंदवला होता. या साऱ्या घडामोडींमुळे उभय देशातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले होते. अमेरिका हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. हे ध्यानात घेता तणाव निर्माण करणाऱ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी रामाफोसानी ओव्हल ऑफिसरुपी ट्रम्प यांच्या गुहेत प्रवेश केला. जेथे तीनच महिन्यांपूर्वी झेलेन्स्की ‘जखमी’ झाले होते.

हलक्या फुलक्या वातावरणात ट्रम्प-रामाफोसा बैठकीची सुरवात झाली असली तरी ट्रम्प यांच्या द. आफ्रिकेतील गोऱ्यांचा नरसंहाराच्या आरोपाने चर्चेचे स्वरुप गंभीर झाले. रामाफोसा यांनी या आरोपाचा इन्कार करताच आपल्याकडे पुरावे आहेत म्हणत ट्रम्प यांनी चित्रफीत सुरु करण्याचा आदेश दिला. पहिल्या दृष्यात द. आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा व विरोधी पक्ष नेते ज्युलियस मालेमा ‘किल द बोअर’ हे गाणे गात असल्याचे दृष्य होते. या गाण्यावर दोनही नेत्यांचे समर्थक नाचत होते. ‘बोअर’ याचा अर्थ गोरा शेतकरी असा होतो. दुसऱ्या दृष्यात पांढऱ्या क्रॉसच्या रांगा दिसत होत्या. ती गोऱ्या शेतकऱ्यांची थडगी आहेत असा ट्रम्प यांचा दावा होता. त्यानंतर ट्रम्प यांनी काही वृत्तपत्रे पुढे केली. मथळे वाचले व टिप्पणी केली, ‘मृत्यू, मृत्यू भयानक मृत्यू’ या साऱ्या तथाकथीत पुराव्यातून ट्रम्प यांना हे सांगायचे होते की दक्षिण आफ्रिका देशात गोऱ्यांचा नरसंहार सुरु आहे आणि सरकार शांत बसले आहे.

Advertisement

ट्रम्प यांच्या आरोपानंतर जगातील काही महत्त्वपूर्ण प्रसार माध्यमांनी ट्रम्पनी पुढे आणलेल्या पुराव्यातील तथ्य तपासले. त्यातून ट्रम्प यांचे दावे खोटे व निराधार असल्याचे स्पष्ट झाले. ‘किल द बोअर’ गाणे गाणारे एक नेते जेकब झुमा 2012 साली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाद्वारे देशाचे अध्यक्ष होते, तेव्हाची चित्रफित ट्रम्प यांनी दाखवली होती. 2018 साली भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले. कालांतराने झुमा यांनी पक्ष सोडला व एमके या पक्षाची स्थापना केली. एमके पक्षास गेल्या निवडणुकीत 14 टक्के मते मिळाली आहेत. दुसरे नेते ज्युलियस मालेमा हे देशात फारसे लोकप्रिय नाहीत. त्यांच्या पक्षास गेल्या निवडणुकीत केवळ 9.5 टक्के मते मिळाली आहेत. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने पक्षातर्फे हे वादग्रस्त गाणे न गाण्याचे वचन यापूर्वीच दिले आहे. अध्यक्ष रामाफोसा सध्या याच सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात. सत्ताधारी पक्षाचे धोरण झुमा व मालेमा या दोन नेत्यांच्या पूर्णत: विरोधात आहे. क्रॉस उभारलेल्या थडग्यांची जी चित्रफित दाखवली गेली ती प्रत्यक्षात थडगी नसून स्मारके आहेत. 2020 साली गोऱ्या शेतकरी जोडप्यास गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यानंतर निषेध म्हणून तात्पुरती क्रॉस असलेली स्मारके निषेधकर्त्यांनी उभी केली व कालांतराने ती काढून टाकण्यात आली. म्हणजे ट्रम्प अस्तित्त्वात नसलेली थडगी उकरुन काढण्याचा प्रयत्न करीत होते. वृत्तपत्रातील मथळे पुढे करीत ट्रम्प यांनी केलेला गोऱ्या शेतकऱ्यांच्या नरसंहाराचा दावाही निराधार आहे. दक्षिण आफ्रिका देशात गोरे लोक एकूण लोकसंख्येच्या 7 टक्के आहेत. मात्र त्यांच्याकडे 70 टक्क्यांहून अधिक जमीन आहे. अर्ध्याहून अधिक काळ्या लोकसंख्येस गरीब म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. वर्णद्वेषी राजवटीचा प्रदीर्घ इतिहास असलेला हा देश प्रचंड विषमतेने ग्रासलेला आहे. या देशातील खूनदर जगात सर्वाधिक आहे. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे देशात वर्षाकाठी साधारणपणे 27,000 खून प्रकरणे होतात. परंतु त्यात गोऱ्यांच्या खूनांची संख्या 1 टक्क्यापेक्षा कमी असते. द. आफ्रिका पोलिस सेवेची आकडेवारी देखील अशीच वस्तूस्थिती स्पष्ट करते. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांनी द. आफ्रिकेस देण्यात येणारी मदत थांबवताना असे म्हटले की, नवा जमीन अधिग्रहण कायदा गोऱ्या आफ्रिकन लोकांकडून भरपाईशिवाय जमीन जप्त करण्याची परवानगी देतो. तथापि, या महिन्याच्या मध्यापर्यंत तरी भरपाईशिवाय कोणतीही जमीन सरकारने ताब्यात घेतलेली नाही. एकंदरीत गोऱ्यांवरील अन्याय व नरसंहाराचा कट सिद्धांत हा बऱ्याच काळापासून वर्णद्वेषी अतिउजव्या विचारधारेचा मुख्य घटक राहिला आहे. दस्तूरखुद्द ट्रम्प यांनी निवडणूकीत प्रतिस्पर्धी कमला हॅरीस यांच्यावर वर्णद्वेषी टीका केली होती. ट्रम्प यांची पाठराखण करणाऱ्यात अमेरिकेतील वर्णवादी ‘व्हाईटस्’ समुहाचा मोठा वाटा आहे. अलीकडच्या काळात ट्रम्प यांचे समर्थक उद्योजक एलॉन मस्क आणि प्रसार माध्यमातील त्यांचे प्रचारक टकर कार्लसन यांनी गोऱ्या नरसंहारावर भाष्य करुन ‘पराचा कावळा’ करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

रामाफोसा आणि झेलेन्स्की यांच्या ट्रम्प भेटीतून आणखी एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे अर्थसत्तातील ‘बळी तो कान पिळी’ असा डार्विनीझम. योगायोगाने ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यातील भेट ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया, कतार व संयुक्त अरब अमिरातीच्या आखाती देशांच्या दौऱ्यानंतर काही दिवसांनीच झाली. या तिन्ही ऊर्जा-समृद्ध देशांच्या राज्यकर्त्यांचे ट्रम्पनी गुणगान गायले. ते म्हणाले, ‘आता कसे जगायचे किंवा स्वत:चे व्यवहार कसे करायचे यावर व्याख्याने दिली जाणार नाहीत.’ ट्रम्प एकीकडे अमेरिकेच्या आखातातील हस्तक्षेपप्रवण धोरणापासून दूर जाऊ पाहतात तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु पाहतात. या विरोधाभासाचे मर्म आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये असाधारण महत्त्व असलेल्या सत्तेच्या आर्थिक मापदंडात सामावले आहे. या मापदंडात द. आफ्रिकेचा क्रमांक खूपच खाली आहे. द. आफ्रिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न केवळ 410 अब्ज डॉलर्स इतके आहे तर अमेरिकेचे 30 ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. रामाफोसा असोत की झेलेन्स्की त्यांचे देश बऱ्याच अंशी अमेरिकन मदतीवर अवलंबून आहेत. ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे ‘कार्ड’ नाही. त्यामुळे त्यांना ट्रम्प यांचा खोटेपणा, धमक्या, अपमान अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.

जरी द. आफ्रिका देशाचा आर्थिक आवाका अमेरिकेच्या तुलनेत अनेकपटीने कमी असला तरी आफ्रिका खंडात हा देश सर्वात मोठी आर्थिक आणि औद्योगिक शक्ती मानला जातो. अशा देशाच्या प्रमुखास ट्रम्प यांच्यापुढे तथ्यहीन दाव्यांचा सामना करीत त्यांच्याच नाकदुऱ्या काढाव्या लागत असतील तर लहान आफ्रिकन देशांचे भवितव्य काय असेल? दक्षिण आफ्रिकेच्या विकासासाठी संकुचित, राष्ट्रवादी दृष्टीकोन कुचकामी ठरणारा आहे. त्यासाठी खंडातील सर्व देशांची भक्कम एकजूट व सामुहिक कृतीवर आधारित खंडव्यापी आर्थिक रणनीतीची आवश्यकता आहे. आफ्रिकेने आपल्या विस्तृत नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर खंडातील लोकांच्या उन्नतीसाठी केला पाहिजे. नववसाहतवादी आर्थिक नीतीद्वारे खंडाचे शोषण करणाऱ्या जागतिक उत्खनन आर्थिक प्रणालीना झुगारुन द्यावयास हवे. अशा आर्थिक प्रारुपाचा वापर केला पाहिजे की, ज्यामुळे केवळ गरिबी संपणार नाही तर लोकांना संपन्नता प्राप्त होईल. परस्पर सहकार्याने खंड स्वावलंबी होऊन एक समर्थ जागतिक शक्ती म्हणून उदयास येईल. ट्रम्प भेटीतून धडा घेतलेले रामाफोसा या साऱ्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा आहे.

                                - अनिल आजगावकर

Advertisement

.