For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकच्या मूर्तीकाराची राममूर्ती आघाडीवर

06:42 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकच्या मूर्तीकाराची राममूर्ती आघाडीवर
Advertisement

प्राणप्रतिष्ठेसाठी 3 मूर्तींमधून केली जाणार मतदानाच्या आधारे निवड

Advertisement

वृत्तसंस्था / अयोध्या

अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात 22 जानेवारी 2024 या दिवशी भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ही मूर्ती तीन मूर्तींमधून निवडली जाणार असून निवड प्रकियेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही निवड राममंदिराचे निर्माण कार्य करणाऱ्या न्यायाचे सदस्य मतदानाच्या आधारे करणार आहेत. सध्या कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांची मूर्ती आघाडीवर आहे, असे समजते.

Advertisement

निवड प्रक्रियेचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला आहे. न्यासाच्या सर्व सदस्यांनी त्यांचे मत अध्यक्ष चंपतराय यांच्याकडे बंद लखोट्यामधून दिले आहे. प्रत्येक लखोटा उघडून मतांची गणना केली जात आहे. राम मंदिरात भगवान प्रभू रामचंद्रांच्या 3 मूर्ती स्थापन केल्या जाणार आहेत. त्यांच्यापैकी गर्भगृहात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, तिची निवड आधी केली जाणार आहे.

बहुमताचा निर्णय मान्य होणार

न्यासाचे सदस्य बहुमताने ज्या मूर्तीची निवड करतील, तीच निवड अंतिम मानली जाणार आहे. बहुमताचा निर्णय सर्व सदस्य मान्य करतील. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा मतभेद निर्माण न होता, निवड प्रक्रिया पूर्ण होईल. ऊर्वरित दोन मूर्ती राममंदिरात इतरत्र स्थापित केल्या जाणार आहेत. गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होणारी मूर्ती अरुण योगीराज यांचीच असेल हे निश्चित मानले जात आहे.

अरुण योगीराज यांचा अल्प परिचय

अरुण योगीराज हे कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. योगीराज शिल्पी यांनी म्हैसूरच्या वाडियार राजघराण्याच्या अनेक राजप्रासादांचे सुशोभीकरण केलेले आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विश्वविद्यालयातून व्यवस्थापन तज्ञ ही पदवी घेतली आहे. पण ते आपल्या पित्याची शिल्पकलेची परंपरा पुढे चालवित आहेत. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 30 फूट उंचीची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा दिल्लीत इंडिया गेटनजीकच्या अमर जवान ज्योती स्थलाच्या पाठीमागे स्थापित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रतिमेची प्रशंसा केली आहे. त्यानंतर त्यांनी आद्य शंकराचार्य यांची 12 फूट उंचीची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा केदारनाथ येथे स्थापित करण्यात आली आहे. ही प्रतिमा साकारल्यानंतरच अरुण योगीराज प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आता भगवान रामलल्लाच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्यांच्या मूर्तीची निवड झाल्यास तो त्यांच्यासाठीही मोठ्या अभिमानाचा क्षण सिद्ध होणार आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.