महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘राममय’ भारत

06:31 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सध्या भारतात देशभर राममय वातावरण आहे. बहुतेक लोकांच्या चर्चेमध्ये राम आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वजण अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे याबद्दल चर्चा करीत आहेत. वास्तविक भारतीयांसाठी असे राममय वातावरण निर्माण होणे नवीन नाही. राम हा प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी राम अनेक वाक्मयामधून लोक बोलत असत. अनेकदा लोक एखाद्या गोष्टींमध्ये जर स्वारस्य येत नसेल तर म्हणत असत, त्यात काही ‘राम’ नाही. एकमेकांचे सकाळी भेटल्यावर आजच्यासारखे हॅलो, गुडमॉर्निंग होत नसे तर ‘राम राम’ म्हणून नमस्कार करून स्वागत होत असे. कुणी नातेवाईक अथवा समाजातील व्यक्तीचे निधन झाले तर लोक त्याने ‘राम’ म्हटले असे म्हणत असत. निधन झाल्यावर एखाद्या व्यक्तीला अंत्ययात्रेला घेऊन जात असताना ‘राम नाम सत्य है’ म्हटले जाते. सर्व मंदिरातून प्रवचनाच्या वेळी ‘अंतकाळी राम स्मरावा’ असा उपदेश दिला जात असे. आमच्या लहानपणी दररोज घरी येणारा पोस्टमनसुद्धा घरी पत्र  टाकताना ‘राम कृष्ण हरी’ म्हणून पुकारत असे. कुणाचे नवीन लग्न झाले आणि वधूवर घरात आले की संबंधित नातेवाईक आणि मित्रमंडळी म्हणत असत ‘काय सीतारामसारखे जोडपे आहे’. कोणी व्यक्ती जर खरे बोलत असेल तर ‘रामासारखा सत्यवान आहे’ असे म्हणत असत. बंधुप्रेमाचे उदाहरण देताना ‘काय राम भरतासारखे’ बंधुत्व आहे असे म्हटले जायचे. पतिव्रतेचे उदाहरण देताना ‘ती सीतेसारखी पतिव्रता आहे’ असे म्हणत असत. सिनेमा नाटकातील बहुतेक घरातील घरगडी ‘राम्या’च असायचे. दुकानावरच्या पाट्यांवर आणि घरातील भिंतींवर ‘श्रीराम प्रसन्न’ असायचे. अनेक मंदिरातून श्रीरामनवमी साजरी केली जायची आणि दुपारी श्रीरामजन्माचा पाळणा  झाल्यावर  सुंठवड्याचा प्रसाद वाटला जायचा. संध्याकाळी प्रत्येक धार्मिक घरात मुलामुलींना ‘रामरक्षा’ तोंडपाठ करायची आणि दररोज म्हणण्याची संस्कृती असायची. कोणाला राग आवरण्यासाठी दहा वेळा ‘रामा’चे नाव घे असा सल्ला मिळायचा. रात्री अपरात्री स्मशानासारख्या अथवा भीतीदायक रस्त्यावरून येताना लोक राम, राम, राम, राम म्हणत पळत निघायचे. काही लोक मनातील भीती घालवण्यासाठी रामरक्षा अथवा हनुमानचालीसा म्हणण्याचा सल्ला देत असत. एखाद्या रोगावर प्रभावी औषध असल्यास ‘रामबाण’ उपाय आहे असे म्हणत असत.

Advertisement

सिनेमा क्षेत्रामध्येसुद्धा सन 1913  साली प्रदर्शित झालेला पहिला भारतीय सिनेमा दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा होता. राजा हरिश्चंद्र हा श्रीरामाचा पूर्वज होता आणि सत्यनिष्ठ होता. तो श्रीरामासारखाच सूर्यवंशामध्ये (इक्ष्वाकू) जन्माला आला  होता आणि अयोध्येचा राजाही होता. त्याचप्रमाणे नाट्याक्षेत्रामध्येसुद्धा पहिले नाटक हे सांगलीचे विष्णुदास भावे यांनी सन 1843 ला सादर केले त्याचे नाव ‘सीता स्वयंवरे’ असे होते. या नाटकाच्या यशानंतर भावेंनी रामायणातील अनेक प्रसंगावर प्रयोग केले. त्यानंतर 1955-56 च्या काळात वाल्मिकी रामायणावर आधारित दर रविवारी एक अशी 56 गाणी गीतरामायण या मालिकेतून दूरदर्शन भारतामध्ये यायच्या अगोदर 4 वर्षे ऑल इंडिया रेडिओच्या पुणे केंद्राद्वारे प्रसारित केले होते. ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी गायिलेले आणि संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी गाजले. आजही याचे आकर्षण कमी झालेले नाही. ‘दूरदर्शन’ च्या इतिहासात रामानंद सागर यांनी निर्माण, लेखन आणि दिग्दर्शित केलेली ‘रामायण’ ही शृंखला  जगातील सर्व भाषांतील शृंखलांपैकी सर्वात जास्त पाहिली गेलेली दूरदर्शन शृंखला आहे. 1987-88 च्या दरम्यान दर रविवारी प्रसारित झालेल्या या रामायण शृंखलेला इतका प्रतिसाद मिळाला होता की सकाळी 10 च्या दरम्यान सगळे रस्ते निर्मनुष्य होत असत, दुकाने बंद होत असत, सर्व व्यवहार ठप्प होत असत आणि लोक रामायण सुरू होण्याच्या अगोदर अंघोळ करून एखाद्या देव्हाऱ्यासमोर बसल्याप्रमाणे टीव्हीला हार घालत असत. इतके धार्मिक वातावरण या रामायण मालिकेने निर्माण केले होते. हेच रामायण सन 2020 ला जेव्हा कोरोना काळातील लॉक डाऊनच्या दिवसात पुनर्प्रदर्शित करण्यात आले आणि विश्व स्तरावर दर्शकांच्या संख्येने सर्व विक्रम पाठीमागे टाकले आणि रामायण ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका ठरली. आत्तापर्यंत 70 कोटी लोकांनी रामायण मालिका पाहिली आहे आणि आजही तितकीच लोकप्रिय आहे. वैज्ञानिक क्षेत्रात तर रामसेतू नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Advertisement

असा हा राममय असलेला भारत पुन्हा एकदा श्रीरामाच्या आगमनासाठी सज्ज झालेला आहे. श्रीराम वनवासातून आणि रावणाचा अंत केल्यावर अयोध्येमध्ये परत आल्यावर वातावरण कसे होते याचे वर्णन रामायणमध्ये आहे. सर्वप्रथम श्रीराम, लक्ष्मण, सीता अयोध्येकडे येत आहेत ही वार्ता श्रीरामाची चातकासारखी वाट पहात असलेल्या राजा भरताला हनुमंताने अयोध्येच्या वेशीवर असलेल्या नंदीग्राम येथे येऊन दिली. त्यानंतर भरताने शत्रुघ्नला बोलावून ही आनंदाची वार्ता कौशल्या, सुमित्रा, कैकयी आणि इतर नगरवासियांना देण्यासाठी अयोध्येत पाठविले. ही वार्ता ऐकताच अयोध्यावासियांनी नगर भगव्या झेंड्यांनी आणि पताक्मयांनी सजवले, तसेच सर्व मार्गावर सुवासिक पाणी शिंपडले. सर्व घराघरातून आनंदाच्या लहरी वाहू लागल्या. लोक रामाचा जयजयकार करत गर्जना करू लागले. स्त्रिया आणि पुऊष एकत्र येऊन श्रीरामांच्या आगमनासाठी आपापल्या घराला आणि नगराला सुशोभित करू लागले. घाईघाईने सर्व सिद्धता करून अयोध्यावासी श्रीरामाच्या स्वागतासाठी नंदिग्रामला पोहोचले. भरताने रामाच्या पादुका डोक्मयावर घेतल्या होत्या आणि राजभूषण असलेले पांढरे छत्र श्रीरामांनी हातात घेतले होते. स्वागतासाठी दुदुंभीचा व शंख फुंकण्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. आनंदित झालेल्या नगरवासियांची मुखे उमललेल्या कमळाप्रमाणे दिसत होती.तेवढ्यात हनुमंताला आकाशात पुष्पक विमान दिसले व तो आनंदाने गरजला ‘ते पहा श्रीराम येत आहेत’

त्यावेळी सर्व अयोध्यावासियांनी मोठा जयजयकार केला आणि प्रत्येकजण आकाशातील चंद्राप्रमाणे पुष्पक विमानात बसलेल्या श्रीरामांना पाहण्यासाठी पुढे पुढे होऊ लागला. जवळ आल्यावर सर्वांनी आदराने आपल्या प्रिय राजा श्रीरामांना दंडवत घातले, गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी भरताने इतकी वर्षे सेवा केलेल्या पादुका प्रेमाने परत श्रीरामांच्या पायात घातल्या आणि हात जोडून पुन्हा आज्ञाधारकाप्रमाणे उभा राहिला. या अनुभवांनी त्याचे हृदय विरघळून गेले आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे श्रीरामाचे अयोध्येत आगमन म्हणजे खरोखरच सर्वांच्या जीवनातील एक आनंदोत्सव होता. यालाच रामराज्य म्हणतात, जिथे श्रीरामांना प्रसन्न करणे हाच एक हेतू असतो. मग आपोआपच सर्व समाज सुखी, समृद्ध आणि परिपूर्ण राहतो.

संत तुकाराम महाराज असे रामराज्य आपल्या अभंगातून व्यक्त करताना म्हणतात, आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ।।1।।आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ।।ध्रु.।।करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ।।2।।झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारी बाळें ।।3।।अर्थात ज्यावेळी प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण अयोध्येत आले त्यावेळी सर्व अयोध्यावासियांना खूप आनंद झाला. सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जयजयकार केला व प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा भरताला आलिंगन देतात. प्रभू रामचंद्र अयोध्येत आले त्यामुळे सर्व लोकांना, स्त्री-पुऊषांना, परिवारांना खूप आनंद झाला. त्यांचे स्वागत करण्यासाठी शंख, भेरी, तुताऱ्या व इतर वाद्यांचा लोक गजर करू लागले. प्रभू रामचंद्र सीता व लक्ष्मण यांचे आगमन ज्यावेळी झाले त्यावेळी सर्व स्त्रियांनी प्रभू रामचंद्राला, सीतेला व लक्ष्मणाला अक्षय वाण करून ओवाळले. तुकाराम महाराज म्हणतात, त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला व रामराज्य चालू झाले व या कारणामुळे पृथ्वीवरील सर्व जीव त्यामध्ये गाई, वासरे, स्त्री, पुऊष, लहान, वृद्ध सर्वांनाच आनंद झाला.”

आशा करूया प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील आगमनाने सर्व भारतीय या दिव्य सुखाचा अनुभव घेतील व पुनश्च आपले जीवन राममय बनवतील.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article