रामा पोळजी यांच्या पुस्तकाची ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी राज्यस्तरावर निवड
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावचे सुपूत्र तथा जि.प.शाळा मठ कणकेवाडीचे उपक्रमशील शिक्षक व कवी रामा वासुदेव पोळजी यांच्या रंग मनाचे या कवितासंग्रहाची समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य आत्मसात होण्याकरता त्यांच्या अनुभवाशी नाते जोडणारी पुस्तके पूरक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने पुस्तक निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता.त्यासाठी राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षक ,अधिकारी, कर्मचारी यांना पुस्तक लिहिण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.त्या आवाहनास अनुसरुन येथील मठ कणकेवाडी वेंगुर्ला या शाळेतील उपक्रमशील शिक्षक रामा पोळजी यांनी आपले रंग मनाचे हे पुस्तक सादर केले होते.जिल्हास्तर परीक्षणातून या पुस्तकाची समग्र शिक्षा २०२४-२५ योजनेच्या ग्रंथालय योजनांसाठी अंतिम निवड करण्यात आली. पुस्तकांचे वाचन करणे म्हणजे सर्जनशीलतेच्या वाटेने चालणे असते.विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या जडणघडणीच्या वयापर्यंत वाचनाची अभिरुची निर्माण झाली तर पुढे तो वाचन संस्कार कायम राहतो शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहून ती राज्य शासनाकडून प्रकाशित करुन सर्व शाळांपर्यंत पोहोचण्याचा देशभरातील पहिलाच उपक्रम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रामा पोळजी हे बालसाहित्य चळवळीत काम करणारे शिक्षक व कवी असून त्यांना त्यासाठी यापूर्वी नगरवाचनालय वेंगुर्लेसह अनेक महत्वाचे आदर्श शिक्षक व साहित्यिक पुरस्कार लाभले आहेत.पोळजी यांच्या या साहित्यिक यशाबद्दल त्यांचे शिक्षण व साहित्यिक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.सदर पुस्तक निर्मितीसाठी सिंधुदुर्ग डीएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे,शिक्षणाधिकारी गणपती करमळकर,डॉ .संदिप पवार,अधिव्याख्याता प्रा.राजेंद्र जाधव,उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी,केंद्रप्रमुख महादेव आव्हाड,ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी,यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मत रामा पोळजी यांनी व्यक्त केले.