रामा काणकोणकरने केले मुख्यमंत्र्यांबाबत गंभीर विधान
पणजी पोलिसांनी घेतली दखल, चौकशी सुरू
पणजी : सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविषयी केलेल्या गंभीर विधानाच्या अनुषंगाने काणकोणकर यांना चौकशीसाठी पणजी पोलिसांनी बोलाविले होते. काल गुऊवारी सकाळी रामा काणकोणकर पणजी पोलिस्थानकात चौकशीसाठी उपस्थित राहिल्यानंतर संध्याकाळी त्यांना सोडण्यात आले. काणकोणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, सांकवाळच्या एका प्रकल्पाच्या अनुषंगाने परप्रांतीय लोक स्थानिकांना धमक्या देत आहेत. गोमंतकीयांना जिवंत पुरण्याच्या धमक्या देत आहेत, मात्र याबाबत सरकार काहीच करीत नाही. लोकांचे रक्षण करणे गृहमंत्र्यांचे काम आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्यापेक्षा गृहमंत्र्यांना पुरा असे वक्तव्य काणकोणकर यांनी केले होते. मात्र काणकोणकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी त्यांना गुऊवारी चौकशीसाठी बोलविले होते.
अमित पालेकरांची चौथ्यांदा चौकशी
दरम्यान ओल्ड गोवा पोलिसांनी जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान उर्फ सिद्दिकी खान प्रकरणात अॅङ अमित पालेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावला असून चौकशीसाठी हजर रहाण्यास बजावले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, पालेकर यांची चौकशी करण्यासाठी नवीन धागेदोरे सापडले आहेत. पालेकर यांनी चौकशीला सहकार्य करावे. यासाठी त्यांना समजही देण्यात आली आहे. एखाद्या सशर्त जामीन मंजूर झालेल्या संशयितावर जशा न्यायालयाकडून अटी लादल्या जातात त्याचप्रमाणे पालेकर यांच्यावरही अटी लादण्यात आल्या आहेत. पालेकर यांची यापूर्वी तीन वेळा ओल्ड गोवा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.