राम तेरी गंगा मैली!
देशातील तमाम हिंदू भाविकांनी या मंदिरासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. असंख्य भक्तांचे या मंदिरासाठी प्राण गेले. आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्यांना गोळ्या घालून उत्तर प्रदेशमध्ये ठार करण्यात आले. रामासाठी 35 वर्षांपूर्वी करसेवकांच्या रक्ताने शरयू नदी लाल झाली होती, याची याद विसरलात काय!
अयोध्येतील राममंदिर हा एक संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर जगातील कोणत्याही धार्मिक स्थळाला कदाचित एवढा मोठा इतिहास लाभला नसेल, असा आस्थेचा विषय आहे. देशातील तमाम हिंदू भाविकांनी या मंदिरासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. असंख्य भक्तांचे या मंदिरासाठी प्राण गेले. आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्यांना गोळ्या घालून उत्तर प्रदेशमध्ये ठार करण्यात आले. हा सारा इतिहास आणि त्यानंतर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा आणि त्यातून जनतेच्या कष्टाच्या पैशातून उभारण्यात आलेले हे ऐतिहासिक मंदिर. राम म्हणजे सत्य, त्याग आणि कऊणा या तत्त्वांचा महापुऊष. केवळ देवताच नव्हे तर राम म्हणजे आदर्श पुत्र, राम म्हणजे आदर्श पती, राम म्हणजे आदर्श राजा, राम म्हणजे आदर्श मित्र आणि राम म्हणजे जगातील एक आदर्श बंधू देखील. जनतेच्या त्यागातून आणि जनतेच्या भावनेतून उभारलेल्या राम मंदिराच्या तिजोरीतून पैशांची लूट होणे हा आपल्या देशासाठी काळीमा फासण्याचा प्रकार आहे. राम मंदिराच्या देणगी आणि अर्पण पेटीतील रकमेमधील झालेला अपहार आणि चोरी हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. आपल्या श्रद्धास्थानाला कोणीतरी फार मोठा धक्का देत आहे आणि हा धक्का देणारे दुसरे तिसरे कोणी नसून तथाकथित रामभक्तच आहेत. तळे राखी तो पाणी चाखी, आपल्याला या म्हणीचा प्रत्यय येतोय. त्याहीपेक्षा कुंपणानेच शेत खावे, असा प्रकारचा हा अत्यंत निर्लज्जपणा पवित्रक्षेत्री व्हावा हे आपले खरेच दुर्दैव आहे. साहजिकच या प्रकरणात सत्ताधारी पक्षाची मंडळी आहेत, कारण भाजपने अत्यंत विश्वासार्ह म्हणून ज्या व्यक्तींची निवड करावी त्या व्यक्तींनी केलेले दुर्लक्ष, परिणामी केवळ अठरा हजार ऊपयांचे वेतन घेणारी मंडळी अवघ्या सहा महिन्यांत दीड कोटीचे मालक बनतात, यातून बरेच काही उघड होते. राम हे सत्याचे प्रतीक आहे याची देखील जाण नसावी. आता ही मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक तथा एसआयटी आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे. परंतु एकदा विश्वास उडाला की तो परत मिळणे फारच कठीण होऊन जाते. विश्वास आणि आरसा हे एकमेकाला पूरक आहेत. दोन्ही गोष्टींना एकदा तडे गेले, की आयुष्यात पुन्हा ते जुळत नाहीत. राम मंदिर हे लोकांच्या पैशातून उभारलेले आणि सर्वांनाच ताठ मानेने आपल्याला उभे राहण्याची प्रेरणा देणारे केंद्र आहे. श्रीराम म्हणजे आस्था, श्रद्धा त्यांचे प्रतीक आहे. या श्रद्धेला तेथील कर्मचाऱ्यांनी गालबोट लावले. यामुळे एवढे दिवस हा सारा प्रकार बेफामपणे चालला आणि मंदिराचे व्यवस्थापन चालविणाऱ्या ट्रस्टला हे माहीत नसावे! म्हणजेच सरकारने निवडलेली समिती विश्वासाला पात्र नाही. एकेकाच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडावी, काही जणांच्या घरी अचानक आलेल्या गाड्या एवढेच नव्हे तर बनावट पद्धतीने छापलेल्या पावती पुस्तिका हे सारे प्रकार पाहता हा नियोजनबद्ध कट आहे आणि तो केवळ राम मंदिराच्या विरोधातील नसून साऱ्या देशवासीयांच्या विरोधातील हा कट आहे. त्यामुळे या प्रकरणात सापडलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण ज्या मंडळींनी रामाकडे श्रद्धा भावनेतून आलेले पैसे, दागदागिने लूटले. रामाच्या नावावर आलेल्या देणग्या देखील बाहेरच्या बाहेर लाटल्या. त्यातून रामाच्या भक्तांची ही गंगा आज पुन्हा चिखलमय झालेली आहे. रामासाठी 35 वर्षांपूर्वी करसेवकांच्या रक्ताने शरयू नदी लाल झाली होती, याची याद विसरलात काय! स्वार्थापुढे काही माणसे देवालासुद्धा घाबरत नसतात म्हणूनच तेथील सेवकांना आणि एकंदरीतच समितीमधील काही मंडळींना दुर्बुद्धी सूचली. जे यात गुंतले आहेत, त्यांना आयुष्यात पुन्हा अशा चुका करता येणार नाही याची जाणीव त्यांना व्हावी एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचे आता बरेच मोठे राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होत आहे. संपूर्ण देशातच विरोधकांना आता आयतेच कोलीत सापडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांना टार्गेट करीत राहिलेला आहे. आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदूंची मोठी मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. मुस्लिम व ख्रिस्ती धर्मीयांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाहीत. तिथे भ्रष्टाचार होतोय की नाही याची कल्पना नाही किंवा कदाचित ते उघडही होत नसावे. परंतु आपल्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातून मंदिरांचे उत्पन्नही हजारो कोटी ऊपयांचे आहे. हिंदूंची मंदिरे मंदिर समितीकडे द्यावी. या मागणीवर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत होते, मात्र राम मंदिर प्रकरणी जो काही आर्थिक घोटाळा झालेला आहे तो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारला एक पाऊल मागे घेण्यास या मंडळींनी भाग पाडले आहे. रामाच्या नावाने चंदा गोळा करून तो लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य धडा शिकविणे आवश्यक आहे आणि तोच त्यावर खरा रामबाण’ठरणार आहे.