महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राम साखरेचा खडा

06:19 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दळण सरले की जात्याच्या पाया पडणाऱ्या, जाते म्हणजे अन्नदाता परमेश्वर म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञ असणाऱ्या, जात्यावर संपूर्ण रामायण गाणाऱ्या मालनी अर्थात आपल्या पूर्वज स्त्रिया-त्यांचं अंत:करण म्हणजे एक अद्भुत दालन आहे. भल्या पहाटेची वेळ, सगळे घर साखरझोपेत, ओसरीपाशी जळत असलेला मिणमिणता दिवा आणि तिथे एक पाय मांडी घालून आणि एक पाय सोडून बसलेली मालन. मांडीवरती तान्हे बाळ आणि समोर जाते. ते जाते म्हणजे तिचा जिवाभावाचा मित्र, सखा, तारणहार देव आणि मनाचा आधार. मुखातील ओवी म्हणजे पोटातून ओठात आलेले जगण्याचे रसरशीत संचित. ज्याला काळाचे भय नाही. बायकांचा जन्म फक्त वारसा देण्यापुरता आणि कष्ट करण्यासाठी हे माहीत असूनही जगण्याचा उत्साह. काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून न जाता आपली अक्षरखूण मिरवणारे वाड्.मय म्हणजे ओवी. या ओव्यांमध्ये ना शब्दपांडित्य, ना लौकिकाची आस. आत्मसौख्यासाठी अंतरंगातून उमटलेले शब्द म्हणजे ओवी.

Advertisement

रूढार्थाने या स्त्रियांचे शिक्षण झाले नसले तरी पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे त्या महर्षी व्यास-वाल्मिकींच्या विद्यापीठात शिकल्या. त्यांच्या बुद्धीची झेप बघितली की आपण थक्क होतो. श्री. ना. गो. नांदापूरकर यांनी ‘मर्हाटी स्त्राr रचित रामकथा’ या नावाचे संपूर्ण रामायण असणारे ओव्यांचे संकलन केले आहे. ते पुस्तक वाचताना मन हरखून जाते. त्या काळात बाईचा दिवस अत्यंत कष्टाचा होता. पहाटे जात्यावरचे दळण, केरवारा, सडासारवण, गोठ्याची स्वच्छता, शेण्या थापणे, पाणी भरणे, भांडी घासणे, ताक घुसळून लोणी काढणे, मुलांना अंगावर पाजणे, स्वयंपाक, कपडे धुणे, जणू कामाचा डोंगरच! त्या घराचा उंबरासुद्धा ओलांडत नसत. मग ही बारीकसारीक तपशील असलेली रामकथा त्यांनी ऐकून ग्रहण केली कधी? हा प्रश्न मनामध्ये येतो. या स्त्रियांनी ओव्यांमधून जी रामकथा सांगितली आहे त्यात वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, संस्कृत रामायण, आनंद रामायण अशा अनेक रामायणांमधले सूक्ष्म बारकावे आहेत. याचा उलगडा इंदिरा संत यांनी अप्रतिम अशा ‘मालनगाथा’ या संग्रहात केला आहे. त्या म्हणतात, जेव्हा या स्त्रिया जत्रेला-यात्रेला जात असत तेव्हा रामायणावर कीर्तनं, पुराणं त्यांनी ऐकली आहेत. कुणी पोथी वाचली ती ऐकली आहे. या स्त्रियांना रामाच्या मूर्तीपेक्षा रामाचे नाव मोठे वाटते. कारण पहाटे भिक्षेसाठी त्यांच्या घरी जे रामदासी येतात ते रामाच्या गोष्टी सांगतात. रामाचा जप करायला सांगतात. रामनामाचा मोठा महिमा हा कीर्तनकार, पुराणपोथी सांगणाऱ्या रामभक्त रामदासी यांच्याकडून स्त्रियांनी ऐकला असल्यामुळे त्यांना राम हा आपला गुरुभाऊ वाटतो. कारण रामकथा सांगणारे त्यांना गुरूसमान वाटतात. म्हणून तर एक ओवी अशी आहे-

Advertisement

‘देवा ब्राह्मणापरिस, गुरूचे पद स्रेष्ट ।

राम आवतारी, गुरू केलेत वशिष्ट?’

-पहाटेच्या वेळेला ‘रामप्रहर’ का म्हणतात ते ओव्यांचा अभ्यास केल्यावर कळते. राम हा मालनींच्या देहाचा स्वामी आहे. त्यांचे सारे शरीर रामनामात डोलते. त्यांच्या घरातला पहिला स्वर म्हणजे रामनाम. रामाबद्दलचा जिव्हाळा ओवीओवीमधून ठिबकतो. सारे घर रामनामात न्हाऊन निघते. जात्यावर बसताच पहाटे पहिली ओवी रामरायाला. रामनाम कसे, तर लक्ष तुळस विष्णूच्या पदी वाहावी असे.

पहिली माझी ओवी । रामरायाला गायली

विष्णूच्या पदावरी । लक्ष तुळस वाहिली?

सकाळी उठून । जात्याला लावे हात

आला पहिल्या ववीत। दयाळ रघुनाथ?

-घरातील सर्व मंडळी उठायच्या आत उठणारी मालन रामप्रहरी काय म्हणते?

पहाटच्या पाऱ्यामधी । रामाचं नाम घ्यावं ।

धरती मातवरी । मग पाऊल टाकावं?

-रामाचे नाम घेऊन ती जागी होते. प्रत्येकाला हवा असतो एक जवळचा मित्र. मालनींचा हा मित्र, सखा म्हणजे राम. ती म्हणते ---

सकाळी उठून । राम करावा मित्र ।

सख्याचं नाव घेता । देह व्हईल पवित्र?

ओवी गाणाऱ्या आमच्या पूर्वज स्त्रियांनी अध्यात्म वाचले नाही किंवा सांगितलेही नाही, तर त्या अध्यात्म अक्षरश: जगल्या. त्यांच्याजवळ मी-माझे असे काहीही नव्हते. उपेक्षित आणि परावलंबी जीवन, वारसा देण्यासाठी जणू जन्म. त्यात कष्टमय प्रसूतीसमयी मृत्यू किंवा लहान वयात येणारे वैधव्य यामुळे त्या संसारामध्ये साक्षीभावाने जगल्या. तरी त्या उदास किंवा निराश नव्हत्या. जगण्याची जिद्द, आनंद त्यांच्याजवळ होता. परंतु मनाने त्या निवृत्त होत्या. म्हणूनच ओव्यांमधून मोठे तत्वज्ञान सांगून गेल्या.

सकाळी उठून । रामराम मना बाई ।

पुढच्या जन्माची । सोडवन होईल काही?

पहाटेच्या पाऱ्यामंदी ।  आधी मना रामराम

मंग करा घरकाम ।आपल्या परपंचाच?

प्रपंचापासून त्यांची सुटका होण्याचा संभव नव्हता. म्हणून त्या म्हणतात--

संसारसमुद्राचा । मला कळंना खोलावा ।

राम नावाडी बोलवा । नेईल पैलतीरा?

जन्माला येऊन । प्राणी  प्रपंची बुडाला

नाही अवकाश पडला । रामरायाच्या नावाचा?

-रामाचे नाव हे अंतकाळी मुखात यायला हवे. त्यासाठी देह पवित्र असावा म्हणून त्या म्हणतात,

माझं माझं गं मनोनी । प्रानी यर्थची जाईल।

अंती कामाला येईल । रामरायाचं नाव?

कोणी नाही ग कुणाचं।अवघी लटकी आहे माया

निधानीचा रामराया?

-देहाचे महत्त्व त्यांना कळल्यामुळे देहाचे देवघर करून त्याला शक्तीचे कवाड केले आणि आपल्या हृदयात रामरायाचे बिऱ्हाड थाटले. एकाहून एक अशा उत्तुंग कल्पना या स्त्रियांनी मांडल्या आहेत.

राम राम करता । राम संगतीचा चांगला ।

रामाच्या नावाचा । देही बांधला बंगला?

-देही बांधलेल्या बंगल्याला ना भूकंपाचे भय न पडझडीचे. हा बंगला तर त्यांच्या नावासारखा नितनूतनच राहणार. श्रीरामराया त्यांच्या हृदयात आहेत. त्यामुळे त्याचे नाव विसरण्याचा प्रश्नच नाही; परंतु श्रीरामांचे देऊळ गावात असतेच असे नाही. सगुण मूर्तीचे दर्शन होणे दुर्लभ म्हणून ती मालन म्हणत असावी--

रामसख्याचं नाव । कागदाची घडी।

उकलिते थोडी थोडी । माझ्या हृदयात?

-कामाच्या प्रचंड पसाऱ्यात तिला देवासमोर बसायला, दर्शन घ्यायला वेळ नाही. हा तिचा सखा कागदाच्या घडीमध्ये राहून जातो. मात्र एकांतात ती आपल्या हृदयातील ही ठेव थोडीथोडी उकलीत असते. तिला माहीत आहे--

गना ग गोताला । गाऊनी काय नफा।

रामराया माझा सखा।चुकवी चौऱ्यासीच्या खेपा

नाशिवंत देह । नासून जाईल

रामरायाचं नाव । अंती मोक्षाला नेईल?

-आपले घर जर सुख-समृद्धी आणि शांतीने स्वस्थ हवे असेल तर त्या घरात सदोदित रामनाम उच्चारावे असे या स्त्रिया आवर्जून सांगतात. उंबऱ्याबाहेर पाऊल न टाकणाऱ्या स्त्रियांनी निव्वळ श्रवणभक्तीने रामाला स्वत:च्या हृदयामध्ये हक्काचे स्थान दिले. रामनामाची श्रेष्ठता जाणली ती या स्त्रियांनीच. त्यांच्या देहात जणू रामाचेच राज्य होते. जिभेला केलेली विनवणी मोठी गोड आहे.

रामराम म्हणुनी । जपती माझे ओठ

जिभेभाई घ्यावा घोट । अमृताचा ।

राम राम म्हणुनी । जपती माझ्या दाढा ।

घेई अमृताचा काढा । जिव्हेबाई ।

हात जोडुनी इनंती । जिभेबाई तुला ।

इसरून जाऊ नको । राम माझ्या सोयऱ्याला?

-रामाचे नाव घेतले की यमदूत थक्क होतात. येम म्हणजे यम परतून जातो. अंतकाळी रामच तारतो.

मरणाच्या वेळे । रामनाम घ्यावे

त्याने मुक्त व्हावे ।  चारी लोकी?

श्रीराम म्हणजे पूर्वज स्त्रियांचे गणगोत होते. रामायणाविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धाभाव होता. आधुनिक स्त्रियांना पडतात तसे प्रश्न त्यांना पडले नाहीत. रामायणात अन्याय आहे, स्त्रियांवर मानसिक गुलामगिरी लादली आहे, असे त्यांना आधुनिक स्त्रियांप्रमाणे वाटले नाही. रामाकडे, रामायणाकडे बघताना त्यांची भावना उदात्त आहे. सीतेला सोन्याच्या हरणाची चोळी घालावीशी का वाटली कारण लंकेच्या रावणाची मुदत जवळ आली. मारुती त्यांचा आवडता देव, कारण त्याने श्रीराम-सीतेची भेट घडवून आणली. ओवी वाङ्मयातील एक ओवी रोज म्हणावी अशीच आहे.

रामराम म्हणा । राम साखरेचा खडा

रामाचे नाव घेता । दिवस आनंदात जावा?

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article