चंदनाच्या लाकडावर रामसेतू, रामायण
देवाने कोणामध्ये कोणती कला ओतली असेल ते सांगता येत नाही, असे म्हणण्याची पद्धती आहे. ज्या व्यक्तीला ही कलेची देवदत्त देणगी मिळाली असेल, त्याने ती प्रयत्नपूर्वक संवर्धित मात्र केली पाहिजे. तसे केल्यास हे कलाकार विख्यात होतात. जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे आणि आपले नाव उन्नत करतात. मध्यप्रदेशातील धार्मिक नगरी उज्जैन येथील दोन युवा बंधूंची कहाणी अशीच आहे. या दोघांनाही चित्रकलेची जन्मजात देणगी लाभली आहे.
चित्रकार सौरभ कैथवास याने एका छोट्या शंखावर संपूर्ण रामायण चितारुन चार विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांचेच चुलत बंधू चेतन कैथवास यांनी चंदनाच्या छोट्या लाकडावर रामसेतूचा संपूर्ण इतिहास चितारुन पाच विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. ज्या चंदनाच्या लाकडावर रामसेतूचा संपूर्ण इतिहास चितारण्यात आला आहे, त्याचा आकार अवघा साडेदहा सेंटीमीटर गुणिले दोन सेंटीमीटर इतका आहे. एवढ्या कमी आकारमानात 80 चित्रांच्या साहाय्याने संपूर्ण रामकथा चितारण्यात आली आहे. तर सौरभ यांनी संपूर्ण रामायणाची कहाणी ज्या शंखावर चितारली आहे, त्याचा आकार आहे 2.5 सेंटीमीटर गुणिले 1.6 सेंटीमीटर इतका. या आकारमानात त्यांनी रामायणातील 24 प्रसंग चितारले आहेत. शंखाच्या वरच्या भागात भगवान श्रीरामांचा जन्म, त्यांचे शिक्षण, त्यांचा सीतेशी विवाह इत्यादी प्रसंग आहेत. विशेष म्हणजे ही चित्रकला त्यानी जलरंगात साकारली असून त्यासाठी त्यांना केवळ दोन तासांचा वेळ लागला आहे. यामुळे त्यांचे नाव जागतिक विक्रमांच्या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहे. दोन्ही चुलत बंधूंच्या या कलाविष्काराने त्यांचे नाव जगाच्या पटलावर प्रसिद्ध झाले आहे.