राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर
वृत्तसंस्था/ रोहतक
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा 13 व्यांदा फरलोवर तुरुंगातून बाहेर पडत सिरसा येथे पोहोचला आहे. यावेळी त्याला 21 दिवसांचा फरलो मिळाला आहे. या कालावधीत तो डेरा सच्चा सौदा परिसरातच राहणार आहे. या कालावधीत डेरा प्रमुख विविध धार्मिक आणि सेवाभावी कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. परंतु 29 एप्रिल रोजी डेरा स्थापना दिनावरून प्रशासनाच्या चिंता यामुळे वाढल्या आहेत.
29 एप्रिल रोजी डेरा सच्चा सौदाचा 77 वा स्थापना दिन आहे. या दिवशी देशविदेशातून लाखोंच्या संख्येत अनुयायी डेरा सच्चा सौदात पोहोचण्याची शक्यता आहे. डेरा प्रमुखाने सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश जारी करत अनुयायांना डेरामध्ये न येण्याचे आवाहन केले असले तरीही मागील अनुभव पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मागील वर्षी राम रहीमला 28 फेब्रुवारी रोजी 30 दिवसांचा फरलो मंजूर झाला होता, तेव्हा त्याने 10 दिवस सिरसा येथे तर उर्वरित कालावधी उत्तरप्रदेशच्या बरनावा येथे घालविला होता. त्यादरम्यान देखील सिरसा येथे मोठ्या संख्येत अनुयायी जमले होते. यावेळी देखील अशीच स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या स्थापनादिनी मोठ्या संख्येत अनुयायी पोहोचल्यास सुरक्षा आणि गर्दी नियंत्रण प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरू शकते.