आचरा रामेश्वर संस्थानात रामजन्मोत्सव सोहळा दिमाखात
देवस्थान कमिटी, आचरा पोलीस, आरोग्य यंत्रणेचे चोख नियोजन
परेश सावंत / आचरा प्रतिनिधी
रविवारी चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत होते. त्याचवेळी दुपारी १२.३९ च्या मुहूर्तावर रामजन्माची 'जय जय रघुवीर समर्थ' अशी ललकारी होताच तोफा दणाणल्या. नगारे-ताशे झडू लागले. आचरानगरीत रामनामाचा नाद नभी पुरता निनादत होता. रामजन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरानगरीत साजरा होणारा राम जन्मोत्सव सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. या उत्सवाला मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी उपस्थिती दर्शवत उत्सवात सहभागी झाल्या होत्या.जिल्ह्यात रविवारी सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला. मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी 'जय जय रघुवीर समर्थ'च्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.