कुडाळेश्वर मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा थाटात
वार्ताहर/कुडाळ
श्री राम जय राम जयजय राम अशा नामघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात गुढीपाडवा ते श्रीरामनवमी उत्सव या कालावधीत श्रीराम नवमी महोत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गुढीपाडव्याला या श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतारी नाटक, किर्तने, भजने आदी कार्यक्रम पार पडले. रविवारी श्रीरामनवमी दिवशी सकाळपासूनच रामभक्तानी रामजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात आलोट गर्दी केली होती. किर्तनकार प्रशांत धोंड यांच्या किर्तनाने राम जन्मोसोहळ्याला रंगत आली. त्यांनी रामजन्मावर आधारित अप्रतिम किर्तन सादर केले. त्यामुळे मंदिर परिसर राममय झाला होता. दुपारी 12.30 वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसाद (सुंठवडा) वाटप करण्यात आला. रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.