For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम हा आमचा शत्रूच ! द्रमुक नेते राजा यांचे वादग्रस्त वक्तव्य

06:01 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
राम हा आमचा शत्रूच   द्रमुक नेते राजा यांचे वादग्रस्त वक्तव्य
Advertisement

: भारत हा देश नसल्याचीही दर्पोक्ती

Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

‘राम हा आमचा शत्रू आहे. त्यामुळे तामिळनाडूत जय श्रीराम किंवा भारत माता की जय अशा घोषणा चालणार नाहीत. भारत हे राष्ट्र नाही,’ अशी वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधाने द्रविड मुन्नेत्र कळघम या तामिळनाडूतील पक्षाचे नेते ए. राजा यांनी एका जाहीर सभेत केल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ही जाहीर सभा गेल्या रविवारी कोईंबतूर येथे झाली होती. या सभेत राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अश्लाघ्य भाषेत तोंडसुख घेतले आहे.

Advertisement

याच पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र तसेच तामिळनाडूचे एक मंत्री उदयनिधी यांनी काही महिन्यांपूर्वी सनातन धर्माला उद्देशून अत्यंत विकृत विधाने केली होती. सनातन धर्म हा कोरोना, एड्स आणि महारोग आदी भयानक रोगांच्या जंतूंसारखा आहे. त्याचा समूळ नायनाटच केला पाहिजे, अशी भाषा केल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती. या त्यांच्या विधानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावर नुकतेच कठोर ताशेरे ओढले आहेत. आता ए. राजा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा असाच वाद निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सभा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या 71 व्या जन्मदिवसानिमित्त 3 मार्चला कोईंबतूर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राजा यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. माझा रामायण आणि रामावर विश्वास नाही. रामायण हे सामाजिक सौहार्द शिकविते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिपादन करत असतील तर ते शक्य नाही. रामायण सौहार्द शिकविणारा ग्रंथ नाही. राम हा आमचा शत्रू आहे असे आम्ही मानतो, तामिळनाडूत रामायण चालणार नाही. तुमची भारत माता आम्हाला नको आहे, अशी अनेक विधाने त्यांनी केली.

भारत हा देश नाही

भारत हा देश नाही. ज्या भूभागावर एक भाषा, एक संस्कृती आणि एक धर्म असतो, त्याला देश म्हणतात, अशी नवी व्याख्याही त्यांनी भाषणात मांडली आहे. भारत हे केवळ एक उपमहाद्वीप आहे असेही विधान त्यांनी केले. त्यांनी राहुल गांधी यांच्या काही विधानांचा आधारही घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.

भाजपची कडाडून टीका

ए. राजा यांच्या या विधानांवर भारतीय जनता पक्षाने कडाडून टीका केली आहे. तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीला जाब विचारला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम हा विरोधी पक्षांच्या आघाडीतील एक पक्ष आहे. त्या पक्षाचे नेते अशी प्रक्षोभक, फुटीरतावादी आणि बनावट विधाने करीत आहेत. पण विरोधी आघाडीतील एकही पक्ष या विधानांचा निषेध करत नाही. याचा अर्थ विरोधी पक्षांच्या पूर्ण आघाडीचे हेच विचार आहेत, असा होतो, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यम कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. सनातन धर्माची अश्लाघ्य भाषेत मानहानी केल्यानंतर आता समस्त भारतीयांच्या श्रद्धेचे स्थान असणारे प्रभू रामचंद्रही विरोधकांना शत्रूस्थानी दिसू लागले आहेत. या साऱ्याची मोठी किंमत विरोधकांना आगामी निवडणुकीत मोजावी लागणार आहे. त्यांचा धुव्वा उडाल्याशिवाय रहाणार नाही, असा घणाघात भारतीय जनता पक्षाने केला आहे.

Advertisement
Tags :

.