For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राम दरबाराची गुरुवारी प्राणप्रतिष्ठा

06:31 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
राम दरबाराची गुरुवारी प्राणप्रतिष्ठा
Advertisement

अयोध्येत भाविकांचा महासागर : 7 मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा :  रामनगरीत मोठा बंदोबस्त

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्या आणखी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरणार आहे. राम मंदिरात मंगळवारपासून तीन दिवसीय महाआयोजन सुरू झाले असून तेथे मंदिर परिसरात राम दरबारसमवेत अन्य देवालयांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचा समारोप 5 जून रोजी राम दरबारच्या प्राणप्रतिष्ठापनेसह होणार असून यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य अतिथी म्हणून सामील होतील.

Advertisement

या 3 दिवसीय महाआयोजनात मंगळवारी अन् बुधवारी सकाळी 6.30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पूजा-अनुष्ठान होतील. तसेच हनुमान चालीसा आणि अन्य भजनांचे पाठ सुरू झाले आहेत. मुख्य सोहळा गुरुवारी होणार असून यात राम दरबार (भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान) च्या प्राणप्रतिष्ठेसह 7 अन्य मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना होणार आहे.

राम जन्मभूमीत दुसऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या दिवशी पंचांग पूजन, मंडप प्रवेश, यज्ञ मंडप पूजन, ग्रह योग, अग्निस्थापन, वन, कर्म कुटी, जलाधिवास अनुष्ठान होतील. श्रीराम जन्मभूमी परिसरात राम दरबारासमवेत सर्व मंदिरांमध्ये स्थापित मूर्तींच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया मंगळवार सकाळपासून आरंभ झाली आहे. प्राण प्रतिष्ठेचे हे अनुष्ठान काशीचे यज्ञाचार्य जयप्रकाश यांच्या नेतृत्वात 101 वैदिक आचार्यांकडून पार पडणार आहे. कार्यक्रम पूर्णपणे वैदिक विधींनुसार होणार असून यात रामनगरीचे प्रमुख संत आणि आचार्यांचा सहभाग असणार आहे.

बुधवारी होणार हे अनुष्ठान

बुधवार सकाळी 6 वाजल्यापासून वेदी पूजन, षोडश मात्रिका, सप्त मात्रिका पूजन, योगिनी पूजन, वास्तू पूजन, क्षेत्र पाल पूजन, सर्वतोभद्र पूजन, नवग्रह पूजन, यज्ञकुंड संस्कार, अरणि मंथन आणि यज्ञकुंडात अग्नि स्थापन, कुश कंडिका, प्रणिता प्रोक्षनी स्थापन, अग्नि सिंचनानंतर पंच वारुण हवनाद्वारे पूजन केले जाणार आहे. यानंतर पीठ स्थापित देवतांचे आवाहन अन् पूजन केले जाणार आहे. यादरम्यान भाविकांना दर्शनापासून रोखले जाणार नाही.

5 जून रोजी सामूहिक प्राणप्रतिष्ठा

गुरुवारी आयोजित होणारा मुख्य सोहळा अयोध्येसह पूर्ण देशासाठी ऐतिहासिक असेल. यादिवशी राम दरबारच्या प्राणप्रतिष्ठेसह 7 अन्य मंदिरांमध्ये देवालयांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्य अतिथीच्या स्वरुपात आयोजनात प्रतिनिधित्व करतील.

भाविकांमध्ये उत्साह

राम जन्मभूमीत सुरू असलेल्या अनुष्ठानांवरून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. देशविदेशातून भाविक या पावन क्षणाचा हिस्सा होण्यासाठी राम मंदिरात पोहोचत आहेत. हे आयोजन केवळ धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण नसून भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिकतेचा गौरवही दर्शविणारे आहे. अयोध्येत पोलीस हायअलर्टवर आहेत, दहशतवादविरोधी पथकाचे कमांडो अन् चिलखती वाहनांना मंदिर परिसराच्या चहुबाजूला तैनात करण्यात आले आहे, ज्याला रेड झोन घोषित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.