झारखंडमध्ये रालोआचे जागावाटप सूत्र निश्चित
पितृपक्षानंतर फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील 81 सदस्यीय विधानसभेसाठी या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होण्याची शक्मयता आहे. या निवडणुकीसाठी रालोआ आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन म्हणजेच ‘आजसू’ आणि जनता दल युनायटेड म्हणजेच ‘जदयू’ सोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचे सह-प्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या दोन्ही पक्षांशी संवाद साधत जागावाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. ‘आजसू’ या निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवणार असून भाजप बॅकफूटवर असल्याचे वृत्त आहे. लवकरच या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरूप दिले जाईल असे सांगण्यात आले.
निवडणूक आयोगाने नुकताच झारखंड राज्याचा दौरा करत पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणूक इतर पक्षांशी युती करून लढवणार आहे. मित्रपक्षांशी सुरू असलेली बोलणी 99 टक्के पूर्ण झाल्याचा दावा हिमंता सरमा यांनी केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी पितृपक्ष संपल्यानंतर अंतिम सूत्र जाहीर केले जाणार आहे.