रालोआ सरकारचे जनहितालाच प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, बिहारमध्ये 12 हजार कोटींच्या प्रकल्पांची कोनशीला स्थापन
वृत्तसंस्था / दरभंगा
केंद्रातील किंवा कोणत्याही राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केवळ जनतेच्या हितासाठीच काम करीत आहे. हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. देशाला विकसीत राष्ट्र बनविण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठीच आम्ही विविध योजनांवर काम करीत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बुधवारी त्यांच्या हस्ते बिहार राज्यातील दरभंगा येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वास्तूची कोनशीला स्थापन करण्यात आली. त्याप्रसंगी ते भाषण करीत होते. त्यांनी बिहारसाठी 12 हजार 100 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांचा शुभारंभही केला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते.
बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दरभंगा येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वास्तूची कोनशीला स्थापन केली. तसेच इतरही अनेक प्रकल्पांच्या प्रारंभाची घोषणा केली. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी बिहारच्या सुप्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शारदा सिन्हा यांचे 5 नोव्हेंबरला दिल्लीत निधन झाले होते.
‘एम्स’ मुळे जनतेचा लाभ
भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दरभंगा येथील रुग्णालयामुळे या भागातील जनतेचा मोठा आरोग्यविषयक लाभ होणार आहे. आरोग्यसेवा मिळविण्यासाठी आता या भागातील लोकांना दूर जाण्याची आवश्यकता उरणार नाही. आज देशात विविध भागांमध्ये 24 आयुर्विज्ञान रुग्णालये आहेत. 2014 मध्ये आमचे सरकार येण्यापूर्वी देशात दिल्लीत केवळ एकच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे रुग्णालय होते. गेल्या दहा वर्षांमध्ये आरोग्य सेवेचा प्रचंड विस्तार आम्ही केला आहे. यामुळे गोरगरीबांचा मोठा लाभ झाला असून त्यांना सुलभरित्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. सर्व क्षेत्रांमध्ये विकासाला प्राधान्य ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारची विशेषता असून लोकांचा प्रतिसादही आम्हाला उत्तम लाभत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केले.
आयुषमान योजना व्यापक
केंद्र सरकारने आणलेल्या आयुषमान भारत योजनेच्या अंतर्गत आजवर देशात 4 कोटी गरीब लोकांना आधुनिक उपचारांचा लाभ मिळाला आहे. ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक लोक आज तिचा लाभ उठविण्यासाठी उत्सुक आहेत. देशासाठी आम्ही चौस्तरीय आरोग्य योजना लागू केली असून आयुषमान भारत हा या योजनेतील एक स्तर आहे. भविष्यकाळातही आम्ही जनतेच्या हितासाठीच प्रयत्न करणार आहोत, अशी मांडणी त्यांनी भाषणात केली.
झारखंडच्या मतदारांनाही आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्याच्या दिवशीच पूर्वी बिहार राज्याचाच भाग असलेल्या आणि आता वेगळे राज्य असलेल्या झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान होत होते. झारखंडमधील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदानात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी विकास कार्यक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर केलेल्या भाषणात केले. झारखंडमधील मतदारांनीही या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले.
आश्वासनांची पूर्ती
जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांना देशाचे नेते बनल्यानंतर त्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या विकास योजनांची देणगी मिळेल असे प्रतिपादन केले होते. त्यानुसार या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारची गुंतवणूक होत आहे. अनेक योजनांवर या दोन्ही राज्यांमध्ये काम होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास योजना
ड दरभंगा येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयाची कोनशीला स्थापन
ड रुग्णालयामुळे बिहारच्या जनतेला अत्याधुनिक आरोग्यसेवांचा लाभ होणार
ड देशाला विकसीत बनविण्याच्या मार्गावर वेगाने अग्रेसर असल्याचे प्रतिपादन