For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभेत रालोआला पुन्हा बहुमत

06:59 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभेत रालोआला पुन्हा बहुमत
Advertisement

पोटनिवडणुकीत रालोआचे 11 उमेदवार बिनविरोध विजयी : काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

9 राज्यांसाठीच्या राज्यसभेच्या सर्व 12 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. सत्तारुढ रालोआने मंगळवारी राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठला आहे. राज्यसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपचे 9 तर सहकारी पक्षांचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे 9 सदस्यांसोबत भाजपचे सभागृहातील संख्याबळ 96 झाले तर रालोआच्या सदस्यांचा आकडा वाढून आता 112 झाला आहे.

Advertisement

बिनविरोध निवडून आलेल्या तीन अन्य सदस्यांमध्ये रालोआतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रीय लोकमंचचा प्रत्येकी एक सदस्य आहे. याचबरोबर रालोआला 6 नामनिर्देशित आणि एका स्वतंत्र सदस्याचे समर्थन प्राप्त आहे. तर दुसरीकडे पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. राज्यसभेत एकूण 245 जागा असून यातील 8 जागा सध्या रिक्त आहेत. यातील 4 जम्मू-काश्मीरमधील तर 4 नामनिर्देशित सदस्यांसाठीच्या जागा आहेत.

काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी हे तेलंगणातून राज्यसभेवर निवडून आले आहेत.  तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नितिन पाटील हे महाराष्ट्रातून आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह हे बिहारमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत.

राजस्थानातून रवनीत सिंह बिट्टू, बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांचा यात समावेश आहे. तिन्ही उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. बिहारमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. मध्यप्रदेशातून जॉर्ज कुरियन तर हरियाणातून किरण चौधरी हे भाजपचे उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. या नव्या घडामोडींमुळे राज्यसभेतील भाजपचे बळ पुन्हा वाढले आहे.

राज्यसभेची ही पोटनिवडणूक आसाममध्ये कामाख्या प्रसाद ताशा आणि सर्वानंद सोनोवाल, बिहारमध्ये मीसा भारती आणि विवेक ठाकूर, हरियाणात दीपेंद्र हु•ा, मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रात उदयनराजे भोसले, पीयूष गोयल, राजस्थानातून के. सी. वेणुगोपाल आणि त्रिपुरातून राज्यसभेवर गेलेले विप्लव देव हे लोकसभेवर निवडून आल्याने होत आहे. तेलंगणात केशव राव तर ओडिशात ममत मोहंता यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांना उर्वरित कार्यकाळ प्राप्त होणार आहे. हा कार्यकाळ 2025-2028 दरम्यान असेल.

राजस्थानातून बिट्टू राज्यसभेवर

लोकसभा निवडणुकीत लुधियाना येथे पराभूत होणारे रवनीत सिंह बिट्टू हे केंद्रात मंत्री आहेत. तीनवेळा काँग्रेस खासदार राहिलेले बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. भाजपने त्यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठविले आहे.

बिहारमधून उपेंद्र कुशवाह

अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उपेंद्र कुशवाह यांना बिहारच्या काराकाट मतदारसंघात पराभव सहन करावा लागला होता. कुशवाह यांनी रालोआच्या वतीने निवडणूक लढविली होती. कुशवाह हे बिहारमधील मोठे नेते आहेत. माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या कुशवाह यांना भाजपने बिहारमधून राज्यसभेवर पाठविले आहे. तर बिहारच्या गोपालगंज येथील मनन कुमार मिश्रा यांनाही भाजपने राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहेस. मनन कुमार मिश्रा हे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.

Advertisement
Tags :

.