राज्यसभेत रालोआ बहुमताच्या नजीक
बहुमतासाठी आवश्यक 121 जागांसाठी चार जागा कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेतही बहुमताच्या नजीक पोहचली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या फेरीत 15 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक झाली होती. 41 स्थानी उमेदवार निर्विरोध निवडले गेले होते. मात्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे मतदान घ्यावे लागले होते. या तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या 15 जागा होत्या. त्यांच्यापैकी 10 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच निर्विरोध आलेल्या 41 जागांपैकी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 20 जागा जिंकल्या आहेत.
हिमाचल प्रदेशात काँग्रेस आमदारांनी, तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आमदारांनी क्रॉस मतदान केल्याने या दोन्ही राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन जागा अधिकच्या मिळाल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीच्या या फेरीत सर्वाधिक लाभ भारतीय जनता पक्षाचा झाला आहे. राज्यसभेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे.
बहुमताला चार जागा कमी
या निवडणुकीच्या पूर्वी राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 109 जागा होत्या. त्यावेळी बहुमतासाठी 10 जागा कमी होत्या. आता या आघाडीच्या सहा जागा वाढल्या आहेत आणि बहुमतासाठी आवश्यक 121 जागांसाठी चार जागा कमी आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पुढच्या फेरीत बहुमताचा आकडा गाठण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निश्चितपणे यश मिळणार आहे.
भारतीय जनता पक्ष 97 वर
राज्यसभेत आता भारतीय जनता पक्ष शतक झळकविण्याच्या अगदी नजीक पोहचला आहे. मंगळवारच्या निवडणुकीनंतर आता या पक्षाच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या 97 झाली आहे. त्याखालोखाल काँग्रेस (29), तृणमूल काँग्रेस (13), द्रमुक आणि आम आदमी पक्ष (प्रत्येकी 10), बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस (प्रत्येकी 9), भारत राष्ट्र समिती (7), राष्ट्रीय जनता दल (6), सीपीएम (5), तसेच अण्णाद्रमुक आणि संयुक्त जनता दल (प्रत्येकी 4) असे राज्यसभेतील बलाबल आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 117 सदस्य असून ही संख्या बहुमतापेक्षा चार ने कमी आहे, असे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.