खंडपीठासाठी 18 रोजी महारॅली
कोल्हापूर :
खंडपीठाच्या मागणीसाठी वकीलांनी पुन्हा आंदोलनाची मोट बांधली आहे. यासाठी टप्प्या टप्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सरकारला जागे करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी शहरातून लक्षवेधी महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत साडे तीन हजार वकील,पक्षकार व विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे असा निर्णय बैठकीत घेतला असल्याची माहिती बारचे अध्यक्ष अॅड सर्जेराव खोत यांनी पत्रकारांना दिली.
18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्व वकील, लॉ कॉलेजचे विद्यार्थी,पक्ष, संघटनांचे पदाधिकारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात एकत्र येतील्. त्यानंतर दुचाकीवरून खंडपीठाच्या घोषणा देत माहिती फलक घेऊन ही रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय, पितळी गणपती,धैर्यप्रसाद हॉल,ताराराणी पुतळा, स्टेशन रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक,शिवाजी महाराज पुतळा,भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक,खानविलकर पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिक्रायांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार आहे.
जिल्हा न्यायालयातील शाहू सभागृहात झालेल्या या बैठकील तालुका बारचे पदाधिकारी हजर होते.सुरुवातीला आजी माजी सर्व अध्यक्षांनी आपली भूमिका मांडली.तालुका बारच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करतो,मात्र केवळ बैठका घेऊन चालणार नाही,ठोस आंदोलन केल्याशिवाय खंडपीठ मिळणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूरला आजपर्यत मागून काहीच मिळालेले नाही, धारवाड खंडपीठ मिळवण्यासाठी तेथील वकीलांनी ज्या प्रमाणे कठोर भूमिका घेतली होती.तशा प्रकारची भूमिका घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. महाराष्ट्र अॅन्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे यांनी लोक अदालतीच्या कामकाजापासून दूर राहणे म्हणजे आपल्या ज्युनिअर वकीलांना मिळणारे मानधन चुकवण्याचा प्रकार आहे, त्यामुळे असे आंदोलन न करता मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट तातडीने घडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.माजी अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आपसातील वाद बाजूला ठेवून एक दिलाने लढा देऊया असे सांगितले.
अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत यांनी बैठकीत वकीलांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. काही वकीलांनी तीव्र शब्दात मत मांडले. त्यामुळे आंदोलनास आलेली मरगळ दूर होत असल्याचे सांगितले. आजपर्यंत झालेल्या आंदोलनाची उजळणी करून दिली. तसेच भविष्यात कोणती पावले उचलायची आहेत,याबाबत विवेचन केले.
बैठकीला जयसिंगपूर बारचे अध्यक्ष अॅड. धनंजय पाटील, सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष अॅड. दत्ताजी कवाळे, कागल बारचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, कुरुंदवाड बारचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कळे बारचे अध्यक्ष अभिजीत पाटील, पन्हाळा बारचे अध्यक्ष रवींद्र तोरसे, शाहुवाडी बारचे अध्यक्ष सावित्री सपाटे, इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बारचे सचिव सदाशिव आरेकर, माजी अध्यक्ष अॅड. रणजीत गावडे, अॅड. गिरीश खडके,अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते,अॅड. संपतराव पवार,अॅड. प्रमोद दाभाडे, अॅड. मीना पवार, तसेच बार असोसिएशनचे वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेतील ठराव
- रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- मुख्य न्यायमूर्ती व मुख्यमंत्री भेटीसाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणे.
-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा भेटीचे नियोजन करून त्यातून खंडपीठाचा मुद्दा उपस्थित करणे.
- खंडपीठासाठी लागणाऊया निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करणे.
- ज्युनिअर वकीलाच्या स्टायपेंड बाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे.