राकसकोप जलाशय पाणीपातळीत 1 फुटाने वाढ
त. भा. वार्ताहर
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात शनिवारी दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावल्याने नोंद झालेल्या सकाळच्या पाणीपातळीत फुटाने वाढ झाली. 15 दिवसांपासून डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यात येत होते. डेडस्टॉकच्यावर पाणीपातळीचा साठा झाला आहे. शनिवारी सकाळी जलाशय पाणीपातळी ही 2447.80 फूट इतकी होती. सायंकाळी यामध्ये फुटाने वाढ होत पाणीपातळी 2448.90 फूट झाली आहे. यंदा बेळगाव शहराला पाणीपुरवठा करताना मोठी समस्या पाणीपुरवठा मंडळाला जाणवली होती. शनिवारी सकाळी 53.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 453.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.1 जून रोजी 19.5 मि.मी., 2 जून रोजी 26.7 मि.मी., 3 जून रोजी 51.6 मि.मी. तर शनिवारी सकाळी 53.1 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी मात्र 4 जून 2025 रोजी एकूण 1330.7 मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षापेक्षा 877 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. तर मागीलवर्षी या दिवशी 2473.50 फूट पाणीपातळी होती. मागील वर्षापेक्षा 24.6 फूट पाणीपातळी कमी आहे.
शहराला अजूनही मोटारीद्वारे पाणीपुरवठा
सध्या बेळगाव शहराला पाणीपुरवठा हा विद्युत मोटारीद्वारे करण्यात येत आहे. जलाशयामधील डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यासाठी 16 जून रोजी 35 हॉर्स पॉवरच्या (अश्वशक्ती) दोन वीज मोटारी जलाशयात टाकण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक मोटार जळाल्याने 50 हॉर्स पॉवरची दुसरी मोटार टाकण्यात आली. जलाशयातील पाणी मोठ्या प्रमाणात उपसा करण्यासाठी पुन्हा एक साडेसात हॉर्स पॉवरची मोटार टाकण्यात आली आहे. सध्या या तिन्ही मोटारी सुरू आहेत. पाणीपातळी व पाण्याचा प्रवाह कमी असल्याने अजून किमान दोन दिवस मोटारीनेच पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपातळीत चार-पाच फुटाने वाढ झाल्यानंतर मोटारी पाण्याबाहेर काढण्यात येतील.