'रक्षाबंधन'ची रत्नागिरी एसटी विभागाला 'ओवाळणी'
रत्नागिरी / प्रवीण जाधव :
रक्षाबंधननिमित्त प्रवासी राजाकडून एसटी रत्नागिरी विभागाला भरघोस अशी ओवाळणी प्राप्त झाली आहे. जिल्हाभरातून ५९ जादा एसटी गाड्यांचे नियोजन विभागाकडून करण्यात आले होते. यामध्ये एकूण ४ हजार ४१६ प्रवाशांनी एसटीचा लाभ घेतला असून सुमारे ४ लाख ८७ हजार ६९० रुपयांचे जादाचे उत्पन्न एसटी रत्नागिरी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला मोठे उत्पन्न प्राप्त करुन दिले. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन व भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण या दिवशी भाऊ-बहिणीकडे किंवा बहीण-भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या सणाच्या कालावधीत एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
रत्नागिरी विभागाचा विचार केल्यास चिपळूण आगारातून ६, ६, गुहागरमधून ४, रत्नागिरी ६, लांजा ८, राजापूर सर्वाधिक २३, मंडणगडमधून १२ असे एकूण ५९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. जादा गाड्यांना प्रवाशांकडून पसंती देण्यात आली. दळणवळणाची अनेक सुविधा उपलब्ध असतानाही प्रवाशांची एसटीला पसंती मिळत असल्याचेच दिसत आहे.
- राज्यभरात एकूण १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न
राज्यभराचा विचार केल्यास एसटी महामंडळाला ८ ते ११ ऑगस्ट दरम्यानच्या काळात एकूण १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. ८ ऑगस्ट रोजी ३०.०६ कोटी रुपये ९ ऑगस्ट रोजी ३४.८६ कोटी व १० ऑगस्ट रोजी ३३.३६ कोटी रुपये तर ११ ऑगस्ट रोजी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले.
- राज्यात महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख
राज्यात रक्षाबंधन सणानिमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.
- रक्षाबंधननिमित्त रत्नागिरी विभागातून सोडण्यात आलेल्या जादा गाड्या
| आगार | फेऱ्या | प्रवासी संख्या | उत्पन्न |
|---|---|---|---|
| चिपळूण | 6 | 252 | 41,216 |
| गुहागर | 4 | 172 | 5,976 |
| रत्नागिरी | 6 | 252 | 98,966 |
| लांजा | 8 | 240 | 51024 |
| राजापूर | 23 | 2557 | 202450 |
| मंडणगड | 12 | 943 | 88058 |
| दापोली | निरंक | — | — |
| खेड | निरंक | — | — |
| देवगड | निरंक | — | — |
| एकूण | 59 | 4416 | 487690 |