राकसकोप जलाशय लवकरच होणार तुडुंब
केवळ दीड फूट पाण्याची आवश्यकता : दुसराही दरवाजा उघडला
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जलाशय तुडूंब होण्यासाठी आता केवळ दीड फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाची पाणीपातळी वाढत असल्याने सायंकाळी वेस्टवेअरच्या सहा दरवाजापैकी 5 क्रमांकचा दरवाजा दोन इंचाने उघडण्यात आला आहे. बुधवारी एक व गुरुवारी दुसरा असे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. दोन्ही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुऊ झाला आहे
एकूण 1330.7 मि.मी.पावसाची नोंद
बुधवारी सायंकाळी वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी एक दरवाजा दोन इंचाने उघडल्यानंतर ही जलाशयाकडील येणारा पाण्याचा ओघ कायम राहिल्याने बुधवारच्या 2472.50 फूट पाणीपातळीत अर्धा फुटाची वाढ होत गुरुवारी सकाळी पाणीपातळीही 2473 फुटापर्यंत पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात त्यामध्ये वाढ होत सायंकाळी पाणीपातळीने 2473.50 फुटापर्यंत झेप घेतली आहे. विस्तारलेला वरच्या भागात पाणीपातळी पूर्ण करण्यास वेळ लागतो. त्यामुळे शनिवारी सकाळपर्यंत जलाशय तुडुंब होणार आहे. त्यामुळे बेळगाव शहरवासियांची पाण्याच्या समस्येचा प्रश्न आता मिटला आहे. गुरुवारी सकाळी 68.8 मि.मी. पाऊस नोंद झाला आहे तर एकूण 1330.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने गंगापूजन
दरवर्षी बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने जलाशयाची पाणीपातळी 2470 फुट पूर्ण झाल्यानंतर शासकीय गंगापूजन करण्यात येते. कार्यकारी अभियंता अशोक शिरुर, उपअभियंता मंजुनाथ, श़्रीमती रुपा यांनी जलाशयाची बुधवारी सायंकाळी विधीवतपणे गंगापूजन केले. यावेळी इराप्पा कनगुटकर, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण सुकये, भाऊराव पाटील, मारुती मोटार, बळीराम नलवडे, वैजू नाकाडी, प्रकाश नलवडे, जोतिबा किणयेकर, अमित कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.