‘राकसकोप’ तुडुंब; जलाशयाचे दोन दरवाजे उघडले
मार्कंडेय नदी काठावरील ग्रामस्थ-शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा, शहरवासियांना दिलासा
त. भा. वार्ताहर
तुडये : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय तुडुंब झाला आहे. जलाशय पूर्ण पाणी पातळी झाली. आता केवळ एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. जलाशयाकडे येणाऱ्या पाण्याच्या मोठ्या ओघामुळे पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता जलाशयाच्या वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन आणि पाच क्रमांकाचा हे दोन दरवाजे चार इंचांनी उचलण्यात आले. त्यामुळे मार्कंडेय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने नदी काठावरील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत डेडस्टॉकमधील पाणीसाठा विद्युतमोटारीद्वारे उपसा करत शहराला पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याच्या वाटेवर असल्याने शहरवासियांना दिलासादायक बाब ठरली आहे. पाण्याबाबतची चिंता आता मिटली आहे.
बुधवारी सकाळी जलाशय पाणीपातळी 2473.40 फूट इतकी नोंद झाली. जलाशय पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे विस्तारलेल्या मोठ्या पाणीपातळीतील 0.60 फूट पाणीपातळी साठ्यात वाढ होत सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी 2474.10 फुटापर्यंत पोहोचली. मागीलवर्षी याचदिवशी पाणीपातळी ही 2475.50 फूट इतकी होती.
जुलै महिन्यात झाला 1065.5 मि. मी. पाऊस
संपूर्ण जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने जलाशय पाणीपातळी डेडस्टॉकमध्ये गेली. जुलै महिन्यात मात्र तब्बल 1065.5 मि.मी. पाऊस झाल्याने पाणी साठ्यात 24.20 फुटाने वाढ झाली आहे. दि. 12 जुलै ते 17 जुलै या सहा दिवसांत पावसाने दडी मारली होती. दि. 5 जुलै रोजी 125.6 मि. मी. तर 7 जुलै रोजी 136.7 मि. मी. हा सर्वात जादा पाऊस झाला आहे.
जलाशय भरण्यास हवा 1000 मि. मी. पाऊस
जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास सरासरी 1 हजार मि. मी. पावसाची गरज असते, हा इतिहास आहे. यावर्षी 20 दिवसांतच 1 हजार मि. मी. पाऊस झाल्याने जलाशयाने आपली पाणीपातळी पूर्ण केली आहे.