राज्योत्सव : उत्सव की उन्माद?
सर्वसामान्य वेठीस : आबालवृद्धांसह रुग्णांना त्रास
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्योत्सवाच्या नावाखाली शहरात शुक्रवारी कन्नड दुराभिमान्यांनी धिंगाणा घातला व सर्व शहरालाच वेठीस धरले. दिवसभर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांचा दिवाळीचा आनंदच हिरावून घेतला. सकाळपासूनच राज्योत्सवाच्या नावाने सुरू झालेला धिंगाणा रात्री उशिरापर्यंत तसाच होता.
राज्योत्सवाचे निमित्त करून ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालून अडविलेले रस्ते, नोकरदार व कामगारांची केलेली अडवणूक, डीजेच्या आवाजाने निर्माण झालेला गोंगाट या सर्व प्रकाराला शांत बेळगावकर वैतागून गेले. डीजेच्या आवाजामुळे लक्ष्मी पूजनासाठी आलेल्या पुरोहितांनासुद्धा त्रास झाला. मंत्र पठण आणि आरती यांचे आवाज डीजेमध्ये हरवून गेले. आपल्या धार्मिक परंपरा जोपासताना झालेल्या या व्यत्ययामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
कोणताही उत्सव जल्लोष साजरा करणे आणि उत्सवाचे उन्मादात रुपांतर करणे यात फरक आहे. मात्र राज्योत्सवाच्या निमित्ताने उन्मादाचेच दर्शन घडले. बॅरिकेड्स लावल्याने रुग्णवाहिकाचालकांना मार्ग काढण्यात त्रास झाला. डीजेच्या तालावर धुडगूस घालणाऱ्यांना त्याचे सुद्धा भान नव्हते. एरवी मराठी भाषिकांच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांवेळी अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असे सांगणाऱ्या प्रशासनाला राज्योत्सवादरम्यान होणारी अशांतता दिसत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर तालुक्यातून कार्यकर्ते दाखल
राज्योत्सवासाठी बेळगावात इतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कन्नड कार्यकर्ते दाखल झाले होते. अथणी, बैलहोंगल, रायबाग, चिकोडी, गोकाक, सौंदत्ती आदी ठिकाणाहून केवळ मिरवणुकीत धुडगूस घालण्यासाठीच कार्यकर्ते दाखल झाल्याचे दिसून आले. बाहेरहून आलेल्या वाहनांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. केवळ मराठी माणसांना डिवचण्यासाठीच मिरवणुकीत धिंगाणा घातल्याचे दिसत आहे.