For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेतृत्व नसल्यानेच भाजपाकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी; निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच : नाना पटोले

05:56 PM Feb 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
नेतृत्व नसल्यानेच भाजपाकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी  निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच   नाना पटोले
Nana Patole
Advertisement

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Advertisement

टिळक भवन मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा सध्या करत आहे. भाजपामध्ये नेतेच नाहीत, कालपर्यंत ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे Party with difference आहे का ? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

चंद्रकांत हंडोरे निष्ठावान कार्यकर्ते, विजयाची खात्री!
काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केले.

Advertisement

जरांगे पाटील यांची शिंदे सरकारकडून फसवणूक..
मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे नवी मुंबईत जरांगे यांच्या लाखो कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. दिलेला शब्द आपण पाळला असेही मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर मग पुन्हा उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल आम्ही त्याचवेळी केला होता याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली.

राहुल गांधींच्या यात्रेचे महाराष्ट्रात भव्य स्वागत होईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेचे स्वागत धुमधडाक्यात होईल, भाजपाने त्याची चिंता करु नये. भारत जोडो यात्रेलाही महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड समर्थन देऊन यात्रा ऐतिहासिक बनवली होती आताही असेच चित्र असेल, असेही नाना पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.