मंडलिक, माने यांना विजयी करा ! राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे
राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचार व रक्तामासाचा वारसदार
मी राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा रक्तामासाचा व विचारांचा वारसदार आहे. ‘ ते ‘ इस्टेटीचे वारसदार होऊ शकतात, अशा शब्दात शाहू महाराजांचे पणतू राजे राजवर्धन कदमबांडे यांनी आज आपली भूमिका मांडली. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी ते काल कोल्हापुरात आले होते. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
1962 मध्ये कोल्हापुरात छत्रपती शहाजी महाराज यांच्याकडून झालेल्या दत्तक विधी विरोधातील विराट जन आंदोलनाचा संदर्भ देऊन ते म्हणाले, विद्यमान शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांचे वारसदार होऊ शकत नाहीत. ते केवळ इस्टेटचे वारसदार होऊ शकतात.
श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज हे राजर्षि शाहू महाराजांचे वारसदार आहेत. मात्र आत्ताचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे छत्रपती राजाराम महाराजांचे वारसदार नाहीत. प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा म्हणून या गादीवर माझा हक्क होता. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा पणतू आहे. त्यामुळे मीच राजर्षि शाहू महाराजांचा वारसदार आहे. कोल्हापूरशी माझा पूर्वापार ऋणानुबंध आहे. जूना राजवाडा येथे माझे वास्तव्य होते.
मी राजर्षि शाहू महाराजांचा वारसदार या नात्याने कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करतो की,महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे. उमेदवार शाहू महाराज यांनी राजर्षी शाहू महाराज यांना साजेसे काम केले नाही ,असा आरोप केला जातो याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशाचं आराध्य दैवत आहे.त्यांचे विचार महाराष्ट्रभर नेण्याचं काम मी करत आहे.
कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज हे जनतेत मिसळतात, अथवा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना साजेसं काम करतात हे माझ्या ऐकिवात नाही.त्यांनी राजर्षि शाहू महाराजांना केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित केलं आहे. मी राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारस आहे. त्यांचा विचार मी लोकांमध्ये पोहोचवला आहे. विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व आमच्यातील वाद हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे.
एमआयएम पक्षाने श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठींबा दिला आहे. याबाबत विचारले असता राजे कदमबांडे म्हणाले, मुस्लिम सुलतानांनी हिंदूंची मंदिरे पाडली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविली. माझ्या विरोधात एम आय एम चा उमेदवार होता. त्यात माझा 2300 मतांनी पराभव झाला. त्यामुळे कोणाचा पाठिंबा घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असल्यास आणि पक्षानेही मला तसेच सूचित केल्यास धुळ्याप्रमाणे मी येथेही सक्रियपणे काम करेन. असे सूचक वक्तव्य ही राजवर्धन कदमबांडे यांनी केले .या पत्रकार परिषदेस सत्यजित उर्फ नाना कदम , किरण शिंदे , अरूण उर्फ बापूसाहेब निबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गादीच्या अवमानाचा प्रश्नच येत नाही .
1962 मध्ये दत्तक प्रकरण गाजले होते. त्याचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहे. दत्तक विधी करण्यासाठी कोल्हापूर जिह्यात त्यांना कुठे जागा राहिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या गादीच्या अवमानाचा विषयच येत नाही. अशा शब्दात राजे राजवर्धन कदमबांडे यांनी गादीच्या कथित अवमानाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
आताच्या महाराजांनी संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे ....
1962 साली दत्तक वारस आंदोलनाच्या विरोधात एक लाख लोकांचा मोर्चा नवीन राजवाड्यावर गेला. भगवे निशान काढून लोकांनी काळे निशाण लावले. हा दत्तक वारस जनतेला मान्य नव्हता. त्यामुळे हा दत्तक विधानाचा विधी बेंगलोरच्या बंगल्यात झाला. तो बंगला आताच्या शाहू महाराजांनी विकला. कात्यायनीचे जंगल त्यांनी विकून टाकले असून अनेक मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला आहे.