राजू शेट्टीचे वादळ आता कोकणातून मुंबईकडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि झुंजार शेतकरी नेते आहेत. ‘कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते’ अशी त्यांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा आहे. त्यांची अभ्यासू आणि झुंजारु वृत्ती यामुळे अनेकांना ते आपला आधार वाटतात. म्हणूनच यंदा आंबा पीक गमावलेले कोकणातील आंबा-काजू बागायतदारही आपला प्रश्न घेऊन त्यांच्याजवळ गेलेत. राजू शेट्टी यांनीही आपल्या पद्धतीने या विषयाचा नीट अभ्यास करून आंबा बागायतदारांच्या लढ्याचे नेतृत्व हाती घेतले आहे. आंबा बागायतदारांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी भव्य मोर्चाने धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोकणातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर 2012 मध्ये राजू शेट्टी कोकणातील पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात उतरले होते. तेव्हा बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीविरोधात आवाज उठविणाऱ्या सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांनी राजू शेट्टी यांची कोल्हापूर येथे जाऊन भेट घेत, आपल्या लढ्याला बळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर शेट्टी कष्टकरी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते. त्यांचे सिंधुदुर्गातील दौरे तेव्हा बरेच गाजले होते. पारंपरिक मच्छीमारांनी राजू शेट्टींना आपल्या बाजूने उभे करून योग्य परिणामकारता साधली होती. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनाही राजू शेट्टींच्या आगमनाची दखल घ्यावी लागली होती. शेट्टी यांच्या दौऱ्यावर सत्ताधारी मंडळींचे बारीक लक्ष असायचे. कारण शेट्टी मच्छीमारांचा प्रश्न हाताळत असतानाच सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदार तसेच शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेत होते. तेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे होते आणि आज जेव्हा आंबा बागायतदारांचा प्रश्न घेऊन शेट्टी रस्त्यावर उतरलेत, तेव्हा राणेंचे धाकटे चिरंजीव नीतेश राणे पालकमंत्री आहेत.
पण यावेळेस शेट्टींनी जो प्रश्न हाती घेतला आहे, तो सोडविण्यासाठी ते केवळ सिंधुदुर्गपुरते सीमित राहिलेले नाहीत. ते रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. कोकणातील सर्वच आंबा बागायतदारांची वज्रमूठ बांधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या मोहिमेत शेट्टी यांच्यासमवेत खासकरून ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी खासदार, आमदार तसेच विद्यमान पदाधिकारी सहभागी होताना दिसत आहेत. परंतु, त्यामुळे शेट्टी यांच्याकडे पाहण्याचा कोकणातील आंबा बागायतदारांचा दृष्टिकोन हा ‘राजकीय’ अजिबात राहत नाही. ‘शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज’ म्हणूनच त्यांचे नेतृत्व स्वीकारले गेलेय. त्यामुळेच तर ओरोस येथे 12 मार्च रोजी झालेल्या आंबा बागायतदारांच्या भव्य मोर्चात स्वत: पालकमंत्री नीतेश राणे यांनी उपस्थित राहून सरकारच्यावतीने आपली भूमिका मांडली होती. जर राजू शेट्टी यांनी उभे केलेले आंदोलन हे एखाद्या विशिष्ट पक्षाचे आहे, अशी भावना सरकारच्या मनात निर्माण झाली असती, तर सरकारचे प्रतिनिधी मोर्चाला सामोरेच गेले नसते. ‘विरोधी पक्षाचा मोर्चा’ असे म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असते.
शेट्टींनी हाती घेतलेल्या आंदोलनात आंबा बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे लक्षात आल्याने सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. 12 मार्चचा मोर्चा आणि 23 मार्च रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव ते कणकवलीदरम्यान चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर सरकारने हेक्टरी किमान 22 हजार रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत तुटपुंजी असून सरकारने बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप शेट्टी यांनी लगेचच करत त्याविरोधात व्यापक लढा उभारण्याची घोषणा केली. मुंबईत पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे महाआंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटले. मंत्री नीतेश राणे यांनी आंबा, काजू उत्पादकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आल्याचे जाहीर केले. आंब्याच्या प्रत्येक कलमामागे मिळणारी 220 रुपयांची मदत तुटपुंजी आहे. सरकारकडे कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकांच्या पाठिशी राज्य सरकारने उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका आपल्यासह कोकणातील सर्वच मंत्र्यांनी घेतली असल्याचे राणेंनी माध्यमांना सांगितले. मात्र, अद्याप वाढीव मदतीबाबतचा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला नाही. तोपर्यंत राजू शेट्टी यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर येथील शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करून 15 मेच्या महाआंदोलनाची वातावरण निर्मिती सुरु केली आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे, वाढीव मदतीच्या मुद्याबरोबरच त्यांनी बागायतदारांना कर्जमाफी, बोगस कीटकनाशके आणि निकृष्ट खतांचा विषयही लावून धरला आहे. बोगस खते व कीटकनाशकांमुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले. अशा औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करून चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्याची कार्यवाही कृषी आयुक्तांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात 9 एप्रिल रोजी पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयात बैठकही पार पडली आहे. परराज्यातील आंब्याला ‘देवगड’ किंवा ‘रत्नागिरी’ हापूसचे नाव देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शेट्टी आक्रमक आहेत.
महेंद्र पराडकर