कोणाशीही आघाडी नको ही जनभावना...10 वर्षात सरकारने काहीच केलं नाही- राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोणाशीही युती न करता एकट्याने लढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाशीही आघाडी करणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. तसेच मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून कोणतीच अपेक्षा नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
आज कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपण एकटेच लढणार असण्यावर पुन्हा एकदा जोर दिला. ते म्हणाले, "सध्याचे राजकारण पाहता सर्वसामान्यांचा राजकारणी लोकांच्यावरून विश्वास उडाला आहे. यापुर्वीही मी जाहीर केलं होती की आम्ही स्वतंत्र लढणार. या राजकारणात माझ्यासारख्या नेत्याने पडू नये अशी जनभावना आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही आघाडीबरोबर जाणार नाही." असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य केले. ते म्हणाले, "केंद्र सरकारच्या बजेटकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही. गेल्या 10 वर्षात सरकारला शेतकरी वं सामान्यांसाठी काहीच करता आले नाही तर या तीन महीन्याच्या बजेटकडून काय अपेक्षा ठेवणार." असाही टोला त्यांनी सरकारवर हाणला.
सरकारवर टिका करताना ते म्हणाले, "केंद्राकडून केल्या जाणाऱ्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक आहेत.
पामतेल आयातीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. साखर निर्यातीवर बंदी घातल्याने उसाला दर मिळत नाही. केंद्र सरकार केवळ किसान पीएम योजनेचे आकडे शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकत आहे. एकीकडे पीएम किसान योजनेतून दिल्यासारखं करायचं आणि रासायनिक खतातून काढून घ्यायचं. असा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे. तसेच सरकारमधील काही लोकांचा अहंकार आणि आत्मविश्वास वाढला आहे." असेही ते म्हणाले.