Ajit Pawar Kolhapur: जाहीरनाम्याशी सहमत नाही असं स्पष्ट करा, शेट्टींकडून उपमुख्यमंत्र्यांची कानउघाडणी
अजित पवारांनी स्पष्ट करावं की, शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली आहे का?
कोल्हापूर : सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्या मतदार संघात ते आहेत. दौऱ्यादरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? असा उलट सवाल करत त्यांनी यातून काढता पाय घेतला असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री पवारांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, अजित पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते. तेव्हा महायुती आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले नव्हते. 'मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो' असं अजित पवार म्हणत आहेत. तर मग त्यांनी हेही स्पष्ट करावं की, महायुतीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आश्वासन दिलेलं होतं की नाही? शेतकऱ्यांना हमीभावावर 20 टक्के अधिकचं अनुदान देणे कबूल केलं होतं की नाही?
जर असं असेल तर, मी या जाहीरनाम्याशी सहमत नाही. माझ्या पक्षाचा त्या जाहीरनामाची काही संबंध नाही हेही अजित पवारांनी स्पष्ट करावं. त्यातदरम्यान, महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा सातबारा कोरा करणार असं सांगितलं होतं. त्यावर शेतकऱ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. त्यामुळे आता अजित पवारांनी हेही स्पष्ट करावं की, शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली आहे का?
दरम्यान, निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीविषयी मोठ्या घोषणा केल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांचे शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सूर वेगळे येत असल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार चंदगड दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीविषयी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे वातावरण तापण्याची शक्यता आहे.