राजपूत महासभेचे पदाधिकारी चौहान यांचा दुर्घटनेत मृत्यू
राजस्थानात महामार्गावर घडली दुर्घटना
गुरुग्राम :
राजपूत महासभा गुरुग्रामचे अध्यक्ष तिलकराज चौहान यांचा रविवारी रात्री झालेल्या रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. चौहान हे झालावाड येथील नातेवाईकाच्या ठिकाणी आयोजित विवाह सोहळ्यातून परतत असताना महामार्गावर एक डंपर त्यांच्या मर्सिडीजवर उलटली होती.
कारचे सनरुफ तुटल्याने डंपरमधील साहित्य कारमध्ये भरून गेले. याचबरोबर चालकाच्या बाजूकडील हिस्सा चिरडला गेला. यामुळे तेथे अडकून पडल्याने चौहान यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या सीटवर त्यांच्या पत्नी यशोदा सिंह चौहान बसल्या होत्या, त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर डंपर चालकही जखमी झाला आहे.
गुरुग्राम जिल्ह्यातील वजीरपूरचे रहिवासी असलेले 62 वर्षीय तिलकराज चौहान हे मागील अनेक वर्षांपासून राजपूत महासभेचे अध्यक्ष होते. राजकारणात देखील ते अत्यंत सक्रीय होते. 2014 मध्ये त्यांनी सोहना मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती, परंतु ते पराभूत झाले होते.